गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. देश आणि समाजाची सेवा करण्यासाठी मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे ट्विटमध्ये हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/HardikPatel_/status/1104732714173980672

दरम्यान, ते गुजरातमधील जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचीही शक्यता आहे. सध्या जामनगर मतदारसंघाच्या खासदार भाजपाच्या पूनमबेन मादम या आहेत. गुजरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गृह राज्य आहे. काँग्रेसने आपले संपूर्ण लक्ष गुजरातवर केंद्रीत केले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भाजपाला त्यांनी कडवी टक्कर दिली होती.

दरम्यान, २०१५ मध्ये हार्दिक पटेल हे जेव्हा पाटीदार आंदोलन करत होते. त्यावेळी लोक त्यांच्याकडे एक नवा पर्याय म्हणून पाहत होते. काही दिवसांपूर्वी हार्दिक पटेल यांनी आगामी निवडणुकीत उतरणार असल्याचे जाहीर केले होते. पण कोणत्या पक्षाच्या वतीने उभारणार हे त्यांनी सांगितले नव्हते.

पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरुन हार्दिक पटेल यांनी भाजपा सरकारचा विरोध केला होता. २०१५ मध्ये स्थानिक स्वराज संस्था निवडणुका आणि २०१७ मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला होता.

Story img Loader