पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. संसदेचे कामकाज न झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा खासदार आज उपोषणास बसले आहेत. त्यांच्या या कृतीचा समाचार घेत भाजपा सत्तेत असतानाही जर लोकशाही धोक्यात असेल तर त्यांनी सत्ता सोडली पाहिजे. सत्तेत बसण्याचा त्यांना कोणताच अधिकार नसल्याचे हार्दिकने म्हटले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाचे नेते आज आत्मक्लेश म्हणून देशभरात विविध ठिकाणी एकदिवसीय उपवास करत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज विरोधकांनी चालू दिले नसल्याचे कारण सांगत भाजपाकडून हे आंदोलन केले जात आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी भाजपाचा निषेध केला असून भाजपाची ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका केली आहे. त्यांचीच री हार्दिक पटेलने आज ओढली. एकामागोमाग एक ट्विट करत त्याने भाजपावर हल्लाबोल केला.

https://twitter.com/HardikPatel_/status/984263582912163840

उत्तर प्रदेशमधील बलात्कारी आमदाराला पकडण्यासाठी भाजपाने उपवास केला असता तर लोकांना समजलं असतं. पण आता तो आमदारच त्यांचा आहे, कसं पकडायचं त्याला. उन्नावचे प्रकरण विसरण्यासाठी लोकशाही वाचवाच्या घोषणा देत हे उपोषण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. हे सर्व नाटक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

https://twitter.com/HardikPatel_/status/984262483291488256

सत्तेत बसणारेच जर लोकशाही वाचवा ही घोषणा देत उपोषण करत असतील तर यापेक्षा दुसरं चांगलं नाटक कुठलं असेल. जर सत्तेत असतानाही लोकशाहीला धोका असेल तर सत्ता सोडा. तुम्हाला सत्तेत बसण्याचा कोणताच अधिकार नाही. भाजपाच्या लोकांना हेही माहीत नाही की ते लोक विरोधात आहेत की सत्तेत, असा टोला त्यांनी लगावला. चार वर्षांत विकास करता आलेला नाही. जनतेच्या विश्वासालाही पात्र ठरलेले नाहीत. त्यामुळे आता विकास करू देत नाहीत अशा निरर्थक शब्दांचा वापर करत उपोषण करत आहेत. आपल्या खासदारांनी मतदारसंघात किती विकास केला हे महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

https://twitter.com/HardikPatel_/status/984312169054523392

दरम्यान, काँग्रेसप्रणीत यूपीए सरकार सत्तेवर असताना २००४ ते २००९ या काळात संसदेच्या पहिल्या आठ अधिवेशनांत केवळ ३८ टक्के कामकाज झाले. कारण, त्यावेळी भाजपाने अधिवेशनात गोंधळ घातला होता. यूपीए-२ पुन्हा सत्तेवर आली तेव्हा भाजपाच्याच गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज होऊ न शकण्याच्या प्रथेने लज्जास्पद विक्रम नोंदवला. लोकसभेचे ६१ टक्के कामकाजाचे तास वाया गेले होते. याच कालावधीत राज्यसभेचेही ६६ कामकाज वाया गेले होते. काँग्रेसने भाजपावर टीका करताना हाच मुद्दा प्रामुख्याने मांडला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patidar leader hardik patel criticized on bjp pm narendra modi for one day fast against opposition party parliament chaos