गुजरातमधील पटेल समाजाच्या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यावर हार्दिक पटेलच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी होणारा ‘उलट दांडीयात्रा’ कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. गुजरातचे अर्थमंत्री आणि सरकारचे प्रवक्ते सौरभ पटेल यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर मध्यस्थी करीत हार्दिक पटेल आणि मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यात चर्चा घडवून आणण्याची तयारी दर्शविल्यामुळे उलट दांडीयात्रा तूर्त रद्द करण्यात आली आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी पाटीदार अनामत आंदोलन समितीला गुजरात बाहेरूनही अनेकांचा पाठिंबा मिळू लागला आहे. त्याचबरोबर या दांडीयात्रेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. त्या पार्श्वभूमीवर सरकारने एक पाऊल मागे घेत आंदोलकांशी चर्चा करण्याची तयार दर्शविली. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सौरभ पटेल म्हणाले, चर्चेसाठी आम्ही कधीही तयार आहोत. समितीच्या सदस्यांशी माझे बोलणे झाले असून, त्यांनी दांडीयात्रा रद्द करण्याची तयारी दाखविली आहे. माझे हार्दिक पटेलशी बोलणे झालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, समितीचे निमंत्रक अल्पेश कथेरिया म्हणाले की सोमवारी होणारी दांडीयात्रा आम्ही पुढे ढकलली आहे. आमचे नेते हार्दिक पटेल आणि अन्य काहीजण सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास आनंदीबेन पटेल यांची भेट घेणार आहेत. त्यानंतरच पुढील कार्यक्रम जाहीर केला जाईल.

Story img Loader