उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मागील काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. राज्याची करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी योगी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दौरे करतानाचं चित्र दिसत आहेत. जिल्ह्यांमधील आरोग्य व्यवस्था, रुग्णालये, करोना नियंत्रण कक्ष यांना भेट देऊन योगी करोना नियंत्रणासंदर्भातील आवश्यक सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना देत आहेत. मात्र योगींच्या या दौऱ्याचा फटका मिर्झापुरमधील रुग्णांना बसल्याचं चित्र मंगळवारी दिसून आलं. मुख्यमंत्री रुग्णालयामध्ये भेट देण्यासाठी आल्याने अनेक रुग्णांना रुग्णालयामध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे काही रुग्णांना तातडीने दाखल करुन घेण्याची आवश्यकता असतानाही सुरक्षेचं कारण देत उत्तर प्रदेश पोलिसांनी रुग्णांना रुग्णालय परिसराच्या बाहेर रस्त्यावरच बराच काळ उभं केलं. तसेच मुख्यमंत्री गेल्यानंतर रुग्णालयात जा असंही पोलिसांकडून सांगण्यात आल्याचं रुग्णांनी नवभारत टाइम्सशी बोलताना सांगितलंय.

मुख्यमंत्री आले आहेत त्यामुळे ते गेल्यानंतर तुम्ही रुग्णालयामध्ये जाऊ शकता, आता प्रवेश मिळणार नाही, मुख्यमंत्री गेल्यानंतर या असं आम्हाला पोलिसांनी सांगितल्याचं रस्त्यावर उभ्या असणाऱ्या रुग्णांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. एका मुक्या-बहिऱ्या मुलीला त्रास होत असल्याने तिला रिक्षामधून रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन आलेल्या नातेवाईकांना रुग्णालयाच्या बाहेरच थांबवण्यात आलं. रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांबूची नाकाबंदी लावून रस्ता आडवण्यात आला होता. त्यामुळेच रुग्णालयामध्ये छोट्या मोठ्या उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना उन्हामध्येच ताटकाळत उभं रहावं लागल्याचं चित्र दिसून आलं.

कोणाच्या सांगण्यावरुन आणि नक्की कोणत्या कारणासाठी ही नाकाबंदी करुन रुग्णांची अडवणूक करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आले होते त्या आरोग्य व्यवस्था वापरणाऱ्या रुग्णांचीच अडवणूक करुन उपाचारांसाठी सुरक्षेच्या नावाखाली उशीर केला जात असल्याबद्दल अडवणूक करण्यात आलेल्या रुग्णांनी नाराजी व्यक्त केली.

योगी आदित्यनाथ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मे महिना संपेपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येईल असं म्हटलं आहे. तसेच तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केलाय.