Patna Lady Doctor Murder : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये काही दिवसांपूर्वी मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतची हत्या झाल्याची घटना घडली. पत्नी मुस्कान रस्तोगी नामक महिलेने तिचा प्रियकर साहिल शुक्लाला बरोबर घेऊन पती सौरभ राजपूतची हत्या केली. या घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेशात मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर आता बिहारमध्ये एक अशीच खळबळजनक घटना घडली आहे. पाटणा शहरातील एका हॉस्पिटलमध्ये घुसून एका महिला डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पाटणा शहरात खळबळ उडाली आहे.
पाटणा येथे आगम कुआन या परिसरात एक हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल पाटणात प्रसिद्ध आहे. मात्र शनिवारी (२२ मार्च) येथे एक घटना घडली, या घटनेमुळे संपूर्ण पाटणा शहर हादरलं. काही गुन्हेगारांनी येथील एका हॉस्पिटलमध्ये घुसून रुग्णालयातील एका महिला डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या केली आहे. हल्लेखोरांनी तब्बल सात गोळ्या झाडल्या, यात महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. पोलिसांकडून आता हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीची तपासणी करण्यात येत आहे. या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, शनिवारी दुपारी पाटणा येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरच्या चेंबरमध्ये जाऊन तिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच ते सहा हल्लेखोर रुग्णांच्या वेशात हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यानंतर त्या पाच ते सहा हल्लेखोरांनी एका महिला डॉक्टराच्या चेंबरमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी महिला डॉक्टरवर तब्बल सात गोळ्या झाडत हत्या केली. यानंतर हल्लेखोर एका मोटारसायकलवरून पळून गेले. या हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही. तसेच या गुन्ह्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती सांगितली जात आहे.
हत्या झालेल्या महिला डॉक्टर या त्या रुग्णालयाच्या संचालकांच्या पत्नी होत्या. सुरभी राज असं त्यांचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे. त्या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. त्यानंतर त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिल्याचं वृत्तात म्हटलं आहे. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यात येत असून ही हत्या कोणत्या कारणातून करण्यात आली? याचा शोध पोलीस घेत आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडला पाचारण करण्यात आलं असून गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी आणि संशयितांना अटक करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.