पाटण्यात गांधी मैदानावर झालेल्या साखळी स्फोटासाठी वापरलेले बॉम्ब आणि रांचीतून पोलीसांनी जप्त केलेले बॉम्ब हे दोन्हीही एकसारखेच असल्याचे तपासात आढळले. मात्र, इंडियन मुजाहिदीनने आतापर्यंत देशात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब आणि पाटण्यातील बॉम्ब यामध्ये फरक असल्याचेही झारखंड पोलीसांच्या निदर्शनास आले.
पाटण्यातील गांधी मैदानावर २७ ऑक्टोबर रोजी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी सहा साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांची तीव्रता कमी असली, तरी त्यामध्ये सहा जण मृत्युमुखी पडले होते आणि ८० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या स्फोटांनंतर पोलीसांनी बिहार आणि झारखंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. रांचीतून ९ जिवंत बॉम्ब आणि डिटोनेटर्स जप्त करण्यात आले होते. या दोन्ही बॉम्बचे विश्लेषण केल्यावर ते एकसारखेच असल्याचे पोलीसांना दिसून आले.
इंडियन मुजाहिदीनने आतापर्यंत केलेल्या स्फोटांसाठी तयार केलेले बॉम्ब आणि पाटण्यातील स्फोटांमध्ये वापरण्यात आलेले बॉम्ब यामध्ये फरक असल्यामुळे पोलीस वेगवेगळ्या शक्यतांवर विचार करीत आहेत. एकतर इंडियन मुजाहिदीनला आता वेगळ्या पद्धतीने बॉम्ब बनविणारी व्यक्ती मिळाली आहे. इंडियन मुजाहिदीनच्या यासिन भटकळ या दहशतवाद्याला अटक झाल्यामुळे या नव्या व्यक्तीकडे बॉम्ब बनविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरे म्हणजे पाटण्यातील स्फोटांमागे इंडियन मुजाहिदीनचा हात नसून, कोणत्या तरी वेगळ्याच गटाने हे स्फोट घडवून आणल असावे, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, बिहारमधील बोधगयामध्येही काही महिन्यांपूर्वी साखळी स्फोट झाले होते. हे स्फोट घडवून आणण्यासाठी सिलिंडर बॉम्ब वापरण्यात आले होते. सिलिंडर बॉम्ब आणि पाटण्यातील पाईप बॉम्बमध्ये स्फोट घडवून आणण्यासाठी टायमर म्हणून वापरण्यात आलेली घड्याळे ‘लोटस’ याच एकाप्रकारच्या ब्रॅण्डची होती, असेही पोलीसांना आढळले.

Story img Loader