पाटण्यातील गांधी मैदानावर आणि रेल्वे स्थानकावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा तपास बुधवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्यात आला. 
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची नॉर्थ ब्लॉकमध्ये भेट घेतली. सुमारे ३० मिनिटे या दोन्ही नेत्यांमध्ये बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल चर्चा झाली. या चर्चेनंतर या साखळी स्फोटांचा तपास एनआयएकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला. नितीशकुमार यांनी मंगळवारी संयुक्त जनता दलाच्या शिबिरामध्ये या स्फोटांचा तपास एनआयएकडे देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.
गेल्या रविवारी गांधी मैदानावर भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्यावेळीच मैदानावर सहा बॉम्बस्फोट झाले. त्याआधी त्याच दिवशी सकाळी पाटणा रेल्वेस्थानकाच्या स्वच्छतागृहामध्येही एक स्फोट झाला होता. या स्फोटांची तीव्रता कमी असली, तरी त्यामध्ये सहा जणांचा बळी गेला असून, ८० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
जुलैमध्ये बिहारमधील बोधगयामध्ये कमी तीव्रतेचेच बॉम्बस्फोट झाले होते. त्यानंतर तीन महिन्यात पुन्हा एकदा स्फोट झाल्यामुळे राज्यातील कायदा, सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.