रेल्वे खात्यातील वरिष्ठ पदावर नेमणूक होण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपावरून भाच्याला अटक करण्यात आल्याने रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांचे मंत्रिपद शनिवारी धोक्यात आले. विरोधी पक्षांनी तसेच मित्र पक्षांनीही त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दबाव वाढवला आहे. यासंदर्भात कॉंग्रेसच्या सुकाणू समितीची सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक कोणताही निर्णय न होता संपली. कायदामंत्री अश्विनी कुमार यांच्यापाठोपाठ बन्सल यांच्यामुळेही मनमोहनसिंग सरकार अडचणीत आले आहे.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत बन्सल यांनी स्पष्टीकरण केले. त्यांनी राजीनाम्याची तयारी दाखविली नाही, असे समजते.
संसदेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून, त्याआधी बन्सल यांच्याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित आहे. यामुळे उद्या, रविवारी सुकाणू समितीची बैठक पुन्हा होणे अपेक्षित आहे.
रेल्वे मंडळाचे सदस्य म्हणून २ मे रोजी सूत्रे हाती घेणारे महेशकुमार यांनी हा सौदा दोन कोटी रुपयांचा असल्याची सीबीआयला कबुली दिली आहे. या प्रकरणी सीबीआयने विजय सिंगला, महेशकुमार तसेच दलालीचे काम करणारा संदीप गोयल याला अटक केली आहे.
खुद्द रेल्वेमंत्र्याच्या भाच्यालाच सीबीआयने लाच घेताना पकडल्यामुळे आधीच विविध भ्रष्टाचारांच्या आरोपांनी वेढलेल्या मनमोहन सिंग सरकारची चांगलीच गोची झाली आहे. मात्र, या लाचखोरीशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा बन्सल यांनी शनिवारी केला. सार्वजनिक जीवनात आपण नेहमीच प्रामाणिकपणाचे तसेच उच्च मापदंडांचे पालन केले आहे. आपल्या बहिणीच्या कंपनीवर शुक्रवारी पडलेल्या सीबीआयच्या छाप्यांविषयी आपल्यापाशी माहिती नाही. कोणीही नातेवाईक आपल्या कामकाजात हस्तक्षेप करू शकत नाही. भाचा व कुटुंबादरम्यान कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत, सीबीआयने याची चौकशी करावी, असे नमूद करीत बन्सल यांनी हात झटकले.
विरोधकांचा वाढता दबाव
बन्सल यांच्यासोबत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते रवीशंकर प्रसाद यांनी केली. सरकार प्रत्येक निर्णय विकायला तयार आहे. रोज उघड होणाऱ्या नव्या घोटाळ्यात सहभागी मंत्र्यांना पंतप्रधान व सोनिया गांधींचे संरक्षण आहे, अशी टीका प्रसाद यांनी केली. बन्सल यांना पदावरून हटविण्याची मागणी समाजवादी पक्षानेही केली आहे.
महेश कुमार निलंबित
रेल्वेमंत्री पवन बन्सल यांच्या भाच्यास ९० लाख रुपयांची लाच दिल्याच्या आरोपप्रकरणी रेल्वे मंडळाचे सदस्य महेश कुमार यांना शनिवारी रात्री उशिरा निलंबित करण्यात आले. यासंदर्भात सीबीआयकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कुमार यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागाचे अतिरिक्त महासंचालक अनिल सक्सेना यांनी दिली.
दोघा कुरिअर वाहकांना अटक
रेल्व मंडळात बढती मिळण्यासाठी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्या भाच्याला ९० लाख रुपयांची लाच देण्याप्रकरणी सामील असलेल्या दोघा कुरिअर वाहक मुलांना सीबीआयने शनिवारी अटक केली.
या दोघांना अटक करण्यात आल्यामुळे या प्रकरणी अटक झालेल्या संशयितांची संख्या आता सहा झाली आहे. याआधी रेल्वे मंडळाचे सदस्य सिंगला, अन्य सदस्य महेशकुमार, मध्यस्थ संदीप गोयल आणि मंजुनाथ यांना अटक करण्यात आली आहे. या सर्वाना येथे आणून पटियाला हाऊसच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल. महेशकुमार यांच्या घरातून रेल्वे प्रकल्पांशी संबंधित दस्तावेज तसेच अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.
रेल्वेमंत्री बन्सल यांचे भवितव्य अधांतरी
रेल्वे खात्यातील वरिष्ठ पदावर नेमणूक होण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपावरून भाच्याला अटक करण्यात आल्याने रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांचे मंत्रिपद शनिवारी धोक्यात आले. विरोधी पक्षांनी तसेच मित्र पक्षांनीही त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दबाव वाढवला आहे. यासंदर्भात कॉंग्रेसच्या सुकाणू समितीची सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक कोणताही निर्णय न होता संपली.
First published on: 05-05-2013 at 03:12 IST
TOPICSपवन बन्सल
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pawan bansal may have to go over rail bribe