Tirupati Laddu Row: आंध्रप्रदेशमधील तिरुपतीस्थित श्री वेंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून वाटप केल्या जाणाऱ्या लाडवांच्या नमुन्यामध्ये निम्न दर्जाचे तूप आणि प्राण्यांची चरबी आढळल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खबळबळ उडाली. या प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपीचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांच्याकडे अंगुलीनिर्देश केले जात असून आंध्रप्रदेशचे राजकारण तापले आहे. त्यातच आता आंध्रचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांनी प्रायश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. मी प्रसादाच्या लाडूमधील भेसळ रोखू शकलो नाही, त्यामुळे मला आतून फसवणूक झाल्यासारखे वाटत आहे. यासाठी मी ११ दिवसांचा उपवास करून प्रायश्चित करत आहे, अशी पोस्ट पवन कल्याण यांनी एक्सवर टाकली आहे.
उपमुख्यमंत्री पवन कल्याण आता गुंटूर जिल्ह्यातील नंबूर येथील श्री दशावतार वेंकटेश्वर स्वामी मंदिरात २२ सप्टेंबर पासून ११ दिवसांची प्रायश्चित दीक्षा घेणार आहेत. तिरुपती मंदिरातील लाडूमध्ये जनावरांची चरबी आढळल्यामुळे अतीव दुःख झाले. मागच्या सरकारच्या काळात ही घटना घडली असली, तरी मला माझीच फसवणूक झाल्याचे वाटते, त्यामुळे मी प्रायश्चित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.
आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, “आपली संस्कृती, आस्था, विश्वास आणि श्रद्धा यांचा सन्मान करणारी आहे. श्री तिरुपती बालाजी देवस्थानाच्या प्रसादात भेसळ करून जी अपवित्रता पसरविण्याचा प्रयत्न केला गेला, त्याबद्दल मला मनापासून दुःख वाटतेय. खरे सांगायाचे तर मला माझीच फसवणूक झाली असे वाटतेय. त्यामुळे प्रभू वेंकटेश्वरकडे मी प्रार्थना करतो की, त्याची कृपादृष्टी आमच्यावर आणि सर्व सनातन्यांवर कायम राहू दे.”
पवन कल्याण पुढे म्हणाले, मी या क्षणापासून आता देवासमोर प्रायश्चित करून माफी मागत आहे. यासाठी मी ११ दिवसांचा उपवास करण्याचा धर्म संकल्प सोडत आहे. उपवासाच्या शेवटच्या दिवशी १ किंवा २ ऑक्टोबर रोजी मी स्वतः तिरुपती बालाजीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेत आणि देवाची माफी मागणार आहे.
दरम्यान पवन कल्याण यांनी संपूर्ण भारतातील मंदिरांशी संबंधित सर्व समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म संरक्षण मंडळ’ स्थापन करण्याची मागणीही केली आहे. “सनातन धर्माचा कोणत्याही स्वरूपात होणारा अपमान थांबवण्यासाठी आपण सर्वांनी त्वरित एकत्र आले पाहिजे”, असे आवाहन त्यांनी केले होते.