Bhojpuri singer Pawan Singh : भाजपाने शनिवारी (२ मार्च) १६ राज्यातील १९५ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपाला धक्का बसला आहे. कारण पश्चिम बंगालमधील आसनसोल (Asansol) लोकसभेसाठी भोजपुरी अभिनेते आणि गायक पवन सिंह यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांनी आज रविवारी आपण निवडणूक लढविण्यास इच्छूक नसल्याचे सांगितले. एक्स वर एक पोस्ट टाकून त्यांनी निवडणूक लढविता येणार नसल्याचे सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पोस्टमध्ये पवन सिंह म्हणाले, “मी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून मला आसनसोलसाठी उमेदवारी दिली. पण मी काही कारणास्तव आसनसोल या मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छित नाही.” या पोस्टमध्ये पवन सिंह यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना टॅग केले आहे.

भाजपाकडून बॉलिवूडसह भोजपुरी, दाक्षिणात्य आणि बंगाली कलाकारांना लोकसभेची उमेदवारी; वाचा यादी

पवन सिंह यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला. बंगालमधील लोकांच्या ताकदीमुळेच पवन सिंह यांना माघार घ्यावी लागली, असा टोला बॅनर्जी यांनी एक्सवर पोस्ट टाकून लगावला.

या घडामोडीनंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि प्रवक्ते साकेत गोखले यांनीही भाजपावर टीका केली. “पश्चिम बंगालमधील ४२ मतदारसंघापैकी एका जागेवर भाजपाने निवडणूक जाहीर होण्याआधीच माघार घेतली आहे”, असा टोला साकेत गोखले यांनी लगावला.

भाजपाकडून अभिनेते, अभिनेत्रींना तिकीट

भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी शनिवारी (२ मार्च) पत्रकार परिषद घेऊन देशातील १६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये २८ महिला उमेदवारांची नावंदेखील आहेत. पहिल्या टप्प्यात जाहीर केलेल्या यादीनुसार भाजपाने ३४ विद्यमान मंत्र्यांना पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. दरम्यान, पक्षाने चित्रपट आणि टीव्ही कलाकारांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

शत्रुघ्न सिन्हा आसनसोलचे विद्यमान खासदार

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी या उत्तर प्रदेशमधील मथुरा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत. भाजपाने त्यांना यंदा तिसऱ्यांदा मथुरेतून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. अभिनेता पवन सिंहला पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट दिलं होतं. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे सध्या आसनसोलचे खासदार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pawan singh says wont contest lok sabha polls day after bjp names him as candidate from asansol kvg