नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची चार वर्षांसाठी बिनविरोध निवड करण्यात आली. दिल्लीमध्ये शनिवारी पक्षाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. तालकटोरा स्टेडियममध्ये रविवारी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात विरोधकांची एकजूट होण्याची गरज असून त्यासाठी शरद पवार नितीशकुमार यांच्यासह अन्य नेत्यांशीही चर्चा करत आहेत. विरोधकांच्या ऐक्यासंदर्भात कार्यकारिणीमध्ये सविस्तर भूमिका मांडण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते व राज्यसभेतील खासदार प्रफुल पटेल यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली.
विरोधी पक्षांमध्ये अंतर्विरोध आहेत, तरीही भाजपविरोधात एकजूट करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांची अग्रणी भूमिका असेल. लोकामध्ये भाजपविरोधात नाराजी असून विरोधकांनी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. देशात निवडणुकांचे वातावरण निर्माण झाले असून गुजरात, हिमाचल प्रदेश, त्यानंतर कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानंतर लोकसभेची निवडणूकही असेल. हे लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस देशभर अधिक सक्रिय होईल, असेही पटेल यांनी सांगितले.
राजकीय प्रस्तावाप्रमाणे सामाजिक व आर्थिक प्रस्तावही संमत करण्यात आले. दलित-आदिवासींप्रमाणे ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसंदर्भातही केंद्राने निर्णय घेणे गरजेचे आहे. या सामाजिक मुद्दय़ांवरही चर्चा करण्यात आली. महागाई, बेरोजगारी हे प्रमुख आर्थिक प्रश्न असून हे मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे मतही कार्यकारणीमध्ये व्यक्त करण्यात आल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी दिली.