Paytm gets ED notice for FEMA violations : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) फिनटेक फर्म पेटीएमची मालक कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सला दोन उपकंपन्यांच्या अधिग्रहणाच्या संदर्भात काही फेमा (FEMA) नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली नोटीस पाठवली आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

वन९७ कम्युनिकेशन्स (OCL) कडे पेटीएम ब्रँडची मालकी आहे. दरम्यान वन९७ ने बीएसईला त्यांच्याशी सलग्न असलेल्या लिटल इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड आणि निअरबाय इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने फेमा कायद्याचे उलंघन केल्यासंबधी २८ फेब्रुवारी रोजी ई़डीची नोटीस मिळाल्याबद्दल माहिती दिली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

फायलिंगमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार , “हे कंपनीने ग्रुपऑनकडील (Groupon) लिटिल इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड (LIPL) आणि निअरबाय इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (NIPL) या दोन उपकंपन्यांसह काही ठराविक संचालक आणि अधिकार्‍यांच्या अधिग्रहणाच्या संदर्भात २०१५ ते २०१९ वर्षांमध्ये परकीय चलन व्यवस्थापन कायदा, १९९९ (FEMA) अंतर्गत येणार्‍या नियमांचे उल्लंघन केल्याच्या संदर्भात आहे”.

ही नोटीस वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड आणि त्यांनी अधिग्रहण केलेल्या दोन उपकंपन्या एलआयपीएल आणि एनआयपीएल यांना तसेच या कंपन्यांच्या काही सध्याच्या आणि भूतकाळातील संचालक आणि अधिकारी यांना बजावण्यात आली आहे.

तसेच कथित नियामांची उलंघने ही ओसीएल, एलआयपीएल आणि एनआयपीएल यांच्या काही गुंतवणूक व्यवहारांशी संबंधित आहेत, असेही सांगण्यात आले आहे. तर काही कथित नियमांची उल्लंघने ही लिटिल इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड आणि निअरबाय इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचे अधिग्रहण झाले नव्हते तेव्हाची आहेत, असेही फायलिंगमध्ये म्हटले आहे.

पेटीएमने या प्रकरणाबद्दल माहिती देताना सांगितले की, या प्रकरणावर लक्ष केंद्रीत करून तसेच लागू होणार्‍या कायद्यांच्या मदतीने हे प्रकरण हाताळले जात आहे. तसेच या प्रकरणाचा पेटीएमच्या सेवांवर तसेच ग्राहक आणि व्यापाऱ्यांवर काहीही परिणाम होणार नाही, कारण सर्व सेवा या नेहमीप्रमाणे सुरक्षित आणि सुरू आहेत.

Story img Loader