केरळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठे नेते आणि माजी खासदार पीसी चाको यांनी तिकीट वाटपावरून सुरू वादातून राजीनामा दिला आहे. पक्षात गटबाजी माजली असून, काम करणं अवघड झालं आहे, असं सांगत चाको यांनी राजीनामा दिला आहे. चाको यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे.
केरळमध्ये विधानसभा निवडणूक लागली आहे. काँग्रेसकडून तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरू असतानाच पीसी चाको यांनी राजीनामा दिला आहे. चाको यांचा राजीनामा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा झटका मानला जात आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे नेते राहुल गांधी यांना राजीनामा पाठवल्याची माहिती चाको यांनी स्वतः दिली आहे. “मी मागील अनेक दिवसांपासून माझ्या मनात हा विचार सुरू होता. केरळमध्ये काँग्रेस नाहीये. एक काँग्रेस (आय) आणि काँग्रेस (ए) आहे. या दोन्ही पक्षांची एक समन्वय समिती आहे. गटबाजी हा केरळ काँग्रेसला लागलेला मोठा शाप आहे,” अशी टीका चाको यांनी केली आहे.
“केरळ काँग्रेसमध्ये वर्चस्व गाजवणारे दोन गट आहेत. एका गटाचं प्रतिनिधीत्व माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी हे करतात, तर दुसऱ्या गटाचं नेतृत्व विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला हे करतात, असंही चाको यांनी म्हटलं आहे. लोकांना काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणायचं आहे, पण गटबाजी या मार्गात मोठा अडथळ बनला आहे. केरळ काँग्रेसमध्ये असलेली गटबाजीकडे आपण दिल्लीतील नेतृत्त्वाचं लक्ष वेधलं होतं. पण पक्षश्रेष्ठीने दोन्ही गटांनी दिलेला प्रस्तावाला मंजूरी दिली. गटबाजी थांबवण्यासाठी पक्षाने काहीही केलं नाही. काँग्रेस ९० जागा लढवणार असून, त्या दोन्ही गटांमध्ये विभागलेल्या आहेत. केरळ काँग्रेसमध्ये कोणतीही लोकशाही राहिली नसून, उमेदवारांच्या यादीबद्दल प्रदेश समितीसोबत चर्चाही करण्यात आली नाही. काँग्रेससाठी काम करणं अवघड आहे.” असंही चाको यांनी म्हटलं आहे.
I have quit Congress and sent my resignation to party’s interim chief Sonia Gandhi: Senior Congress leader PC Chacko pic.twitter.com/YJsoZch1oE
— ANI (@ANI) March 10, 2021
चाको चार वेळा खासदार राहिलेले आहेत. चाळीस वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय असून, युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली होती. १९६८ मध्ये त्यांची केरल विद्यार्थी युनियनच्या सचिवपदी निवड झाली होती. त्यानंतर १९७०मध्ये त्यांची केरळ युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. १९८० मध्ये चाको केरळ विधानसभेत पोहोचले. त्यानंतर मंत्रिमंडळातही पोहोचले.