दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मानहानीकारक पराभवास सामोरे जावे लागलेल्या काँग्रेसमध्ये आता राजीनामा सत्र सुरू झाल्याचे दिसत आहे. मागील वेळेप्रमाणे यंदा देखील काँग्रेसला दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असताना, आता काँग्रेसचे दिल्ली विधानसभा निवडणूक प्रभारी पीसी चाको यांनी देखील पदाचा राजीनामा दिला आहे.
दिल्लीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाबाबत बोलताना ते म्हणाले, काँग्रेसची घसरण २०१३ मध्येच सुरू झाली होती. जेव्हा शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या. नव्याने उदयास आलेल्या आम आदमी पार्टीने काँग्रेसची संपूर्ण मतं स्वतःकडे वळवली व आम्ही ती मतं पुन्हा मिळवू शकलो नाही. काँग्रेसची ही मतं आजही आम आदमी पार्टीकडेच आहेत.
PC Chacko tenders his resignation from the post of Delhi Congress in-charge. https://t.co/4sj1YzVKs6
— ANI (@ANI) February 12, 2020
या अगोदर दिल्ली विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोप्रा यांनी आपला पदाचा राजीनामा काँग्रेस हायकमांडकडे सोपवला आहे. मी अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला आहे, आता यावर पक्षाच्या हायकमांडकडून निर्णय घेतला जाईल, असं सुभाष चोप्रा यांनी सांगितलं आहे.
आणखी वाचा – Delhi Assembly Election 2020 : दिल्ली काँग्रेस अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी ‘आप’ने ६२ जागांवर विजय मिळवला. तर, दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी ५५ जागा मिळतील असे भाकीत केले होते. मात्र, भाजपला गेल्या वेळेपेक्षा फक्त पाच जागा जास्त मिळाल्या आहेत. दुसरीकडे या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला असून, पक्षाला पाच टक्क्यांपेक्षा कमी मते मिळाली आहेत. सलग दुसऱ्यांदा काँग्रेसला निवडणुकीत खाते उघडण्यात अपयश आले. विशेष म्हणजे काँग्रेसच्या ६३ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. पक्षाच्या फक्त तीनच उमेदवारांना अनामत रक्कम वाचवता आली.