राज्याच्या विधानसभेचे निकाल लागून तीन दिवस उलटूनही सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. राज्यात सर्वाधिक २८ जागा मिळवणारा पीडीपी आणि २५ जागा मिळवणारा भाजप या दोघांपैकी कोणीही सत्तास्थापनेसाठी पुढे न आल्यामुळे अखेर जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी या दोन्ही पक्षांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. सत्तास्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जुगल किशोर यांना राज्यपालांनी पत्र पाठविले आहे.
१ जानेवारीला प्रथम पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती आणि दिवसाच्या उत्तरार्धात जुगल किशोर यांच्याशी राज्यपाल व्होरा चर्चा करणार आहेत. १८ जानेवारी रोजी मागील विधानसभेची मुदत संपणार आहे. त्यामुळे, त्यापूर्वी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे आहे आणि म्हणूनच दोन्ही पक्षांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे राज्यपालांनी पत्रात नमूद केले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये २००२ साली विधानसभेची मुदत उलटून गेल्यावरही तब्बल २२ दिवस राज्यात सरकारची स्थापना करता आली नव्हती. त्यामुळे या कालावधीसाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. अशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे व्होरा यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा सोनवार येथे पराभव करणारे पीडीपीचे उमेदवार मोहम्मद अश्रफ मीर यांनी आपला आनंद एके ४७ मधून गोळ्यांच्या फैरी झाडून साजरा केल्याचे दर्शविणाऱ्या ध्वनिचित्रफिती प्रसिद्ध झाल्याने वादंग निर्माण झाला आहे.
दिवसभरातील ठळक घडामोडी
*अपक्षांची भाजपविरोधी भूमिका
*भाजपला सत्तेपासून दूर रोखण्याचे काँग्रेसचे आवाहन
*भाजपला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्यास पीडीपीचा विरोध, त्यामुळे पीडीपी-भाजप बोलणी रखडली
*काँग्रेससह आघाडी आणि नॅशनल कॉन्फरन्सचा बाहेरून पाठिंबा घेण्याचा पीडीपीसमोर पर्याय
*अखंडत्व, विकास आणि स्थिर सरकार या मुद्दय़ांबाबत राज्यातील सर्व घटकांशी चर्चा केली जात असल्याची भाजपची भूमिका
*मुफ्ती मोहम्मद सईद पंतप्रधानांच्या भेटीला जाणार?