मशिदीवरील भोंगे, देशद्रोह कायद्याचा वापर, अतिक्रमणांच्या कारवाया आदी मुद्द्यांवरून देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. संबंधित मुद्द्यांवरून पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजपावर निशाणा साधला आहे. देशात निर्माण झालेला सामाजिक तणाव वेळीच थांबवला नाही, तर भारताची स्थिती श्रीलंकेपेक्षा भीषण होईल, अशा शब्दांत त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

एनआयए वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटलं की, “एखाद्यानं जरा काही बोललं तरी त्याच्याविरोधात देशद्रोहाचं कलम लावलं जात आहे. वर्तमानपत्रात काही लिहिलं तर त्याच्याविरोधातही देशद्रोहाचं कलम लावलं जात आहे. राजकीय नेत्यांचं तर काही बोलूच नका. अशा कृत्यांना आताच थांबवलं नाही, तर जी स्थिती आता श्रीलंकेची आहे, त्यापेक्षा वाईट स्थिती भारताची होईल. कारण तेथील सत्ताधारी पक्षानं देखील प्रखर राष्ट्रवादाचा मुद्दा रेटून धरला होता. तेथील बुद्ध, मुस्लीम आणि ख्रिश्चनांना आपसात लढवलं जात होतं. पण आज आपण पाहातोय त्यांची काय स्थिती झाली आहे.”

“मला आशा आहे की, सध्या देशातील भाजपा सरकार श्रीलंकेच्या स्थितीतून योग्य धडा घेईल. आणि ते ज्या दिशेनं जाऊ इच्छित आहेत, त्या दिशेनं जाणं ते थांबवतील. देशात जो सामाजिक तणाव वाढवला ते थांबवतील,” असंही त्या यावेळी म्हणाल्या. त्यांनी पुढे म्हटलं की, “सध्या देशात अल्पसंख्यांकावर विशेषत: मुस्लिमांवर हल्ले वाढले आहेत. त्यांची घरं पाडली जात आहेत. अशा घटनांबाबत न्यायालय देखील पुढे येवून कारवाई करत नाहीये, ही दुर्दैवाची बाब आहे.”

दुसरीकडे, भाजप सरकारकडे जनतेला देण्यासारखं काहीच नाही, असा टोलाही पीडीपी प्रमुखांनी लगावला आहे. बेरोजगारी, महागाई या सगळ्यात वाढ होत आहे. देशाची संपत्ती विकली जात आहे. आपला देश आता गरिबीच्या बाबतीत बांगलादेश, पाकिस्तान आणि नेपाळच्या मागे पडला आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानशी चर्चा करणं आवश्यक आहे, असं मेहबूबा मुफ्ती यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. खोऱ्यात सैन्य वाढवून काहीही होणार नाही, असंही त्या म्हणाल्या होत्या.

Story img Loader