भाजपच्या निर्णयाअभावी मेहबूबा यांच्या शपथविधीस विलंब; काँग्रेसला मध्यावधीची आशा
जम्मू-काश्मीरचे दिवंगत मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यामुळे राज्यात सत्तास्थापनेची संधी मिळालेल्या भारतीय जनता पक्षाची मेहबूबा मुफ्ती यांनी कोंडी केली आहे. भाजपशी युती करण्यास प्रारंभापासून विरोध असलेल्या मुफ्ती यांनी आता भाजपसमोर सत्तास्थापनेतील सहभागावर अटी ठेवल्या आहेत. या अटी भाजप नेत्यांना मान्य नाहीत. युतीचा निर्णय होत नसल्यानेच मेहबूबा मुफ्ती यांच्या शपथविधीस विलंब होत असल्याची माहिती भाजपच्या दिल्लीस्थित नेत्याने दिली. पीडीपीच्या भाजपविरोधाचा लाभ घेण्यासाठी काँग्रेस पक्ष सक्रिय झाला असून मुफ्ती यांच्याशी चर्चा करून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल सत्तास्थापनेची चचापणी करीत आहेत. सत्तास्थापनेऐवजी मध्यावधी निवडणूक होण्याची या नेत्यांना आशा आहे.
मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. भाजप व पीडीपीदरम्यान सध्या वाटाघाटी सुरू आहेत. मेहबूबा यांनी भाजपला उपमुख्यमंत्रीपद देणार नसल्याची प्रमुख अट ठेवली आहे. त्यामुळे दिल्लीतील भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत. याशिवाय मेहबूबा यांना सत्तास्थापनेपुर्वी भाजपचेअध्यक्ष अमित शहा यांच्याकडून केंद्र सरकारची भरघोस मदत मिळवून देण्याचे लेखी आश्वासन हवे आहे. फुटीरतावादी संघटनांविषयी सकारात्मक असलेल्या मेहबुबा यांनी भाजप नेते जम्मू-काश्मीरबाबत कोणतेही वादग्रस्त विधान करणार नाहीत, अशी अट ठेवली आहे. सर्व महत्त्वाची खाती पीडीपीकडेच राहतील, असाही मेहबूबा यांचा आग्रह आहे. त्यांच्या अटींमुळे भाजपमध्ये चिंतन सुरूे आहे. भाजपला युती राखण्याची इच्छा असली तरी मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षांसाठी वाटून घेण्याची महत्त्वपूर्ण अट भाजपने पुढे केली आहे. ही अट पीडीपीला कदापी मान्य नाही. काँग्रेसला सत्तास्थापनेत फारसा रस नसला तरी मध्यावधी निवडणुकीच्या शक्यतेची चाचपणी पटेल व आझाद यांच्याकडून करण्यात येत आहे.
नव्या समीकरणांची चर्चा
शासकीय शोक संपल्यावरच सत्तास्थापनेवर चर्चा होईल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते राम माधव यांनी दिली. प्रत्यक्षात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रविवारी मेहबुबा यांची भेट घेतल्यामुळे राज्यात चर्चेला उधाण आले आहे. केवळ वडिलांच्या आग्रहामुळे मेहबूबा यांनी भाजपशी युतीला अनुकुलता दर्शवली होती. परंतु त्यांच्या निधनानंतर त्यांनी भाजपला महत्त्व देणे कमी केले आहे. यापूर्वी मुफ्ती मोहम्मद सईद एम्समध्ये भरती असताना अहमद पटेल, गुलाम नबी आझाद यांनी मेहबूबा यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी एम्समध्ये वीस मिनिटे त्याचंी वाट पाहत थांबल्या होत्या.