भाजपचे टीकेला प्रत्युत्तर
विचारस्वातंत्र्यावर काही हिंसक अतिरेकी विचारांचे गट र्निबध आणीत असून त्यामुळे आर्थिक प्रगतीत अडथळे निर्माण होत आहेत, असा आरोप माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केला आहे. असहिष्णुता व विचारस्वातंत्र्याचा संकोच हा देशावरील आघात आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या देशात वाढत्या असहिष्णुतेबाबत निषेधाचे सूर उमटत असतानाच सिंग यांनी केलेल्या वक्तव्यास महत्त्व आहे. भाजपने मात्र सिंग यांचा आरोप फेटाळून लावला आहे.
असहिष्णुतेमुळे प्रजासत्ताकाची विविधता, धर्मनिरपेक्षता व अनेकतेतील एकतेला धोका आहे. अलीकडेच विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्ती व भाषणस्वातंत्र्यावर काही हिंसक प्रवृत्तींकडून जे आघात झाले ते चिंताजनक आहेत. विचारवंतांवर हल्ले हे मतांशी असहमती व्यक्त करण्यासारखेच आहे. कुणी काय खावे यावरूनही वाद झाले, जातीय आधारावरही काही तंटे झाले, त्याचे कुठल्याही आधारावर समर्थन होऊ शकत नाही, असे सिंग यांनी स्पष्ट केले.
जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीपूर्वी आयोजित परिषदेत ते बोलत होते. विचारी लोकांनी दादरी व इतर घटनांचा निषेध केला आहे व तो देशावरचा आघात असल्याचे म्हटले आहे. मतभेदाचे सूर दडपणे व अभिव्यक्तिस्वातंत्र्याला आडकाठी आणणे यामुळे आर्थिक विकासात अडथळे येतात. नरेंद्र मोदी एकीकडे मेड इन इंडिया व गुंतवणुकीसाठी प्रयत्न करीत असताना आंतरराष्ट्रीय समुदायात चुकीचा संदेश जात आहे. अशा संघर्षांमुळे भारतात भांडवल येणार नाही. नेहरूंच्या काळातील भारतात मतस्वातंत्र्याला महत्त्व होते. अशा स्वातंत्र्याशिवाय मुक्त बाजारपेठ असू शकत नाही. विरोधी मते दडपून टाकली तर प्रगती होत नाही, किंबहुना उद्यमशीलता व स्पर्धेसाठी मुक्त समाजात मतस्वातंत्र्य हीच प्रमुख आवश्यकता असते. त्याशिवाय शांतताही नांदत नाही. धर्म ही खासगी बाब आहे. त्यात सरकारने हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. केवळ इतरांचे स्वातंत्र्य जपण्यापुरतीच सरकारची भूमिका असावी. नेहरूंच्या संकल्पनांना पाठिंबा देणाऱ्या राजकीय, स्वतंत्रतावादी, धर्मनिरपेक्ष, सामाजिक लोकशाहीवादी शक्तींनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा