पीटीआय, आगरतळा : त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. एकूण ८१ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. मतदानासाठी राज्यातील विविध मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. तुरळक घटना वगळता राज्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आले. २ मार्च रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

त्रिपुरा विधानसभेची सदस्य संख्या ६० असून सत्ता स्थापनेसाठी ३१ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत ७९ टक्के मतदान झाले होते. त्यावेळी मतदानाची निर्धारित वेळ वाढवून रात्री ९.३० करण्यात आली होती. यंदा गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक मतदान झाले आहे. राज्यात नुकत्याच पुनस्र्थापित करण्यात आलेल्या ब्रू स्थलांतरितांनी प्रथमच मतदानात भाग घेतला. राज्यात ब्रू निर्वासितांची एकूण लोकसंख्या ३७,१३६ असून त्यापैकी १४,००५ मतदानासाठी पात्र आहेत.

राज्यातील ३.३३७ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. काही ठिकाणी अनुचित घटना घडल्या, पण त्याचे प्रमाण कमी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन घटनांमध्ये माकपचे तीन कार्यकर्ते जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.  

  • त्रिपुरामध्ये एकूण २८.१३ लाख मतदार असून त्यापैकी १३.५३ लाख महिला आणि ६५,००० नवमतदार आहेत.
  •   एकूण २५९ उमदेवार निवडणुकीला उभे असून भाजपने ६० पैकी ५५ मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत.
  • डावी आघाडी ४७ जागांवर निवडणूक लढवत आहेत. राज्यात प्रथमच डाव्यांशी युती करणाऱ्या काँग्रेसने १३ जागांवर उमेदवार उभे केले आहेत.
  • टिपरा मोथा हा प्रादेशिक पक्ष ४२ जागा कोणत्याही मित्रपक्षाशिवाय लढवत आहे, तर एकूण ५८ अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत.