एअर इंडियाच्या विमानात प्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचं प्रकरण सोशल मीडिया असेल किंवा प्रसारमाध्यमं असतील सगळीकडेच गाजलं होतं. या प्रकरणात आता वाहतूक महासंचनलायाने एअर इंडियाला ३० लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. एवढंच नाही तर या विमानाच्या वैमिनिकाचा परवानाही तीन महिन्यांसाठी निलंबित केला आहे.
एअर इंडियाला ३० लाखांचा दंड
DCGA नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी एअर इंडियाला हा दंड ठोठावला आहे. विमानतल्या वैमानिकाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नाही हा ठपका ठेवत त्याला तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. तसंच या विमानाच्या डायरेक्टरला तीन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एअर इंडियाच्या विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका करणारा आरोपी शंकर मिश्राला पोलिसांनी अटक केली आहे. एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करण्यासाठी शंकर मिश्राला चार महिन्यांची बंदीही घालण्यात आली आहे.
घटना उघड झाल्यावर DCGA ने काय म्हटलं होतं?
मागील वर्षी २६ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या न्यूयॉर्क दिल्ली विमानात एका मद्यधुंद व्यक्तीने महिला प्रवाशाच्या अंगावर लघुशंका केली होती. त्यानंतर ६ डिसेंबरलाही असाच प्रकार घडला होता. यानंतर नागरी उड्डाण महासंचलनालयाने या प्रकरणी ताशेरे ओढले आहेत. सदरचा प्रकार अत्यंत किळसवाणा आहे आणि असे प्रकार विमानात घडत असतील तर ते एअर इंडियाचं अपयश आहे असंही डीसीजीएनने म्हटलं आहे.
प्रत्यक्षदर्शी प्रवासी भट्टाचार्जी यांनी काय सांगितलं होतं?
आरोपी मिश्रा याने ज्या विमानात प्रवासादरम्यान महिलेवर लघुशंका केली होती, त्याच विमानात एस भट्टाचार्जी प्रवास करत होते. त्यांनी त्यावेळी नेमके काय घडले होते, याबाबत सविस्तर सांगितले आहे. “दुपारच्या जेवणानंतर ही घटना घडली. आरोपीने त्यावेळी मद्यप्राशन केलेले होते. मला आरोपी एकच प्रश्न परत-परत विचारत होता. मी दुपारचे जेवण केले. त्यानंतर आरोपीकडे लक्ष द्यावे अशी फ्लाइट अटेंडंटला विनंती केली,” अशी माहिती भट्टाचार्जी यांनी दिली होती.
हे पण वाचा –एअर इंडियातील लघुशंका प्रकरणी ‘टाटा सन्स’ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “यापुढे आम्ही…”
“ज्या महिलेवर आरोपीने लघुशंका केली, ती महिला सभ्य दिसत होती. आरोपीने लघुशंका केल्यानंतर दोन कनिष्ठ एअर होस्टेस तेथे होत्या. त्यांनी त्या महिलेला साफ केले. ती घटना घडल्यानंतर मी विमानातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेलो आणि महिलेला दुसरी जागा द्यावी, अशी विनंती केली. मात्र त्यांनी तसे करण्यास नकार दिला. महिलेची जागा बदलायची असेल तर आम्हाला विमानाच्या कॅप्टनला तसे विचारावे लागेल, असे मला त्या अधिकाऱ्यांनी सांगितले,” असे भट्टाचार्जी यांनी सांगितले होते.
नेमकं काय आहे प्रकरण?
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर रोजी एअर इंडियाच्या फ्लाईट नंबर १४२ मध्ये एका पुरुष प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघुशंका केली होती. याप्रकरणी सीआरफीएफने पुरुष प्रवाशाला अटक केली होती. मात्र, महिलेची लेखी माफी मागितल्यानंतर प्रवाशाला सोडून देण्यात आले होते. तत्पूर्वी असाच प्रकार २६ नोव्हेंबर २०२२ रोजी देखील उघडकीस आला होता. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर कलम २९४ आणि ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.