‘पेगॅसस’ हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे काही महत्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने देशात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अन्य एक मंत्री, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा आदींनाही ‘पेगॅसस’द्वारे लक्ष्य करण्यात आल्याची शक्यता माध्यमांनी वर्तवली आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने हा विषय चांगलाच तापला असून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातही पेगॅससच्या वापराबाबत वक्तव्य केलं आहे.

“इस्त्रायल हा भारताचा मित्र आहे आणि माजी पंतप्रधान नेत्यानाहू आणि पंतप्रधान मोदी यांचे मिठ्या मारतानाचे फोटो सगळ्यात जास्त प्रसिद्ध झाले आहेत. पेगॅससचा भारतीय लोकशाहीला धोका आहे आणि देशाची बदनामी आहे हे त्यांनी आम्हाला सांगू नये कारण नेत्यानाहूंच्या प्रचाराला मोदींचे पोस्टर लागले होते. या देशातल्या पत्रकारांह हजारो प्रमुख लोकांसह फोन रेकॉर्ड झाले आहेत. त्यामुळे या चोऱ्यामाऱ्या बंद करणं थांबवलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. हा जनतेशी विश्वास घात आहे. आज आमची नावं दिसत नसली तरी ती त्यात असणार आहेत याची आम्हाल खात्री आहे. महाराष्ट्रातील अनेक नावे त्यात असण्याची शक्यता आहे” असे राऊत म्हणाले.

Project Pegasus: यामागे मोदी सरकार नाही तर मग कोण?; सुब्रहमण्यम स्वामी यांचा थेट सवाल

महाराष्ट्रात पेगॅससचा वापर झालेला असू शकतो असे पत्रकारांनी विचारले असता राऊत यांनी १०० टक्के याचा वापर झालेला आहे असे म्हटले. “महाराष्ट्रात अशी तंत्रज्ञान आणि यंत्रणा आम्हाला रोखण्यासाठी वापरली गेली आणि आजही वापरली जात असावी. हे फार मोठं षडयंत्र आहे आणि सरकारी मदतीशिवाय अशा प्रकारचं धाडस आणि हिम्मत कोणी करु शकत नाही,” असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना खासदार राऊत यांनी भाजपावर टीका केली. “सरकारच्या खुलाश्याला काही अर्थ नाही. जर हे सरकार काँग्रेसचं किंवा अन्य कोणत्या पक्षाचं सरकार केंद्रात असतं आणि भाजपा विरोधी पक्ष असता आणि हे प्रकरण समोर आलं असतं तर भाजपाने संपूर्ण देशात तांडव केला असता. पण आज ते आम्हाला ज्ञान शिकवत आहेत की लोकशाहीला धोका आहे, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

इस्रायली गुप्तहेर तंत्रज्ञान संस्थेच्या अनेक सरकारी ग्राहकांनी सूचिबद्ध केलेल्या माहितमधून ३०० हून अधिक भारतीय मोबाईल क्रमांकाचा समावेश आहे. हे मोबाईल क्रमांक मंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकार, विधिज्ञ, उद्योगपती, सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ, मानवी हक्क कार्यकर्ते आणि इतरांनी वापरलेले आहेत, असे शोधपत्रकारितेच्या ‘प्रोजेक्ट पिगॅसस’मधून उघड झाले आहे.

‘पेगॅसस’ काय आहे?

जगभरातील महत्त्वाचे सुमारे १,४०० मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पेगॅसस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केले आहे, अशा बातम्या २०१९मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. व्हॉटस अ‍ॅप या समाज माध्यम कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था- ‘एनएसओ’ला न्यायालयात खेचण्याचा इशारा २०१९च्या ऑक्टोबरमध्ये दिला होता.

Story img Loader