पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून नेते, वकील तसेच पत्रकारांची हेरगिरी केल्याच्या आरोप सत्ताधारी भाजपवर करण्यात येतो. आता याच पेगॅसस स्पायवेअरबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठा खुलासा केला आहे. ईस्त्रायलच्या NSO या कंपनीने २५ कोटी रुपयांत पेगॅसस स्पायवेअर विकण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला होता, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय.

पश्चिम बंगालमध्ये दोन नगरसेवकांची नुकतीच हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर भाजपाच्या आमदारांनी हा तर लोकशाहीवरील हल्ला आहे असे म्हणत, ममता बॅनर्जी यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्याला उत्तर म्हणून ममता बॅनर्जींनी गुरुवारी (१७) मार्च रोजी विधानसभेत पेगॅसस स्पायवेअरचा उल्लेख केला. त्यानंतर ममता यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी वरील माहिती दिली. “काही वर्षांपूर्वी पेगॅसस हे स्पायवेअर २५ कोटी रुपयांत खरेदी करण्यासाठी आम्हाला विचारण्यात आलं होतं. मात्र मी ते खरेदी केलं नाही. चंद्राबाबू नायडू यांच्या काळात आंध्र प्रदेशकडे हे स्पायवेअर होते. मला लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अतिक्रमण करायचे नव्हते. म्हणून मी ते स्पायवेअर खरेदी केले नाही,” असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.

तसेच पत्रकारांशी संवाद साधताना ममता बॅनर्जी यांनी पेगॅसस स्पायवेअरच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं. “या स्पायवेअरचा वापर देशाची सुरक्षा तसेच देशविरोधी लोकांचा मागोवा घेण्यासाठी झाला की नाही, मी हे विचारणार नाही. मात्र पेगॅसस हे स्पायवेअर राजकीय नेते, न्यायाधीश तसेच सरकारी अधिकाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी नक्की वापरले गेले. हे नक्कीच क्षमा करण्यासारखे नाही,” असे बॅनर्जी म्हणाल्या.

दरम्यान, इस्त्रायली कंपनी NSO च्या माध्यमातून पेगॅसस हे स्पायवेअर खरेदी करुन देशातील काही नेतेमंडळी, न्यायाधीश तसेच पत्रकारांवर पाळत ठेवण्यात आली, असा आरोप मोदी सरकारवर करण्यात येतो. मात्र भाजपाने हा दावा फेटाळून लावलेला आहे. सध्या या वादावर पडदा पडला होता. मात्र आता ममता बॅनर्जी यांनी पेगॅसस खरेदी करण्यासाठी मला विचरणा झाली होती हे सांगून पुन्हा एकदा या वादाला फोडणी दिली आहे.

Story img Loader