पाकिस्तानी नागरिक सध्या महागाईने त्रस्त झाले आहेत. साध्या खाण्या-पिण्याच्या पदार्थांसाठीही पाकिस्तानी लोकांना संघर्ष करावा लागत आहे. अनेक राज्यांमध्ये गहू आणि गव्हाच्या पीटाचा तुटवडा भासत आहे. अनेक ठिकाणी अन्नधान्यासाठी चेंगराचेंगरी, मारहाण आणि हिंसा भडकल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका ट्रकमागे मोटारसायकल रॅली निघालेली दिसत आहे. नीट व्हिडिओ पाहिला तर कळतं ही रॅली नसून ट्रकमधून गव्हाचे पीट आपल्याला मिळावे, यासाठी हे लोक मोटारसायकलवरुन पाठलाग करत आहेत. एवढंच नाही तर चालत्या ट्रकमध्ये चढून एक व्यक्ती मला पीट द्या, अशी मागणी करतानाही दिसत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानमधील भीषण अन्नटंचाई समोर आलेली आहे. पाकिस्तानमधील नॅशनल इक्वल पार्टीचे नेते प्राध्यापक सज्जार राजा यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओच्या आधारे पाकिस्तानमधील सद्यस्थिती किती बिकट बनत चालली आहे, याकडे त्यांना जगाचे लक्ष वेधायचे आहे.

पाहा व्हिडिओ –

या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, ट्रकमधला गहू, पीट आपल्याला मिळावे, असा प्रयत्न लोक करताना दिसत आहेत. एक माणूस तर ट्रकजवळ येऊन पैसे देताना दिसत आहे. पैसे घ्या आणि पीट द्या, अशी विनवणी तो करत आहे. या व्हिडिओनंतर सज्जार राजा यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांनाही एक इशारा दिला आहे. तुम्ही लोक वेळेत आपले डोळे उघडा, असे आवाहन ते करत आहेत. पीओकेमध्ये सात दशकाहून अधिक काळ बलुचिस्तानसारखाच स्थानिकांसोबत भेदभाव केला जात आहे, आजही परिस्थितीत फार सुधार झालेला नाही.

खैबर पख्तूनख्वा, सिंधू प्रांत आणि बलूचिस्तानमध्ये गंभीर परिस्थिती

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा, सिंधू प्रांत आणि बलूचिस्तानमध्ये महागाईने आस्मान गाठले आहे. पीटाचे एक पाकिट तिथे तीन हजार रुपयांना विकले जात आहे. रस्त्या रस्त्यावर अनधान्यासाठी लोक हिसंक होत चालले आहेत. ज्यांचे उत्पन्न कमी आहे, अशा लोकांचे तर हाल खूपच वाईट आहेत. घाऊक बाजारात गव्हाची आवक कमी झाल्यामुळे रिटेल दुकानदारांना गहू आणि पीटचा पुरवठा होत नाहीये. त्यामुळे ठिकठिकाणी दुकानांबाहेर लोकांच्या रांगा दिसत आहेत. कधीतरी अन्नधान्य येईल आणि आपल्यााल वेळेत मिळेल, या आशेवर लोक उभे आहेत.

पीओकेमध्ये गंभीर परिस्थिती

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्येही परिस्थिती वेगळी नाही. तिथेही खाद्य पदार्थाचा पुरवठा होत नाही आहे. अन्नधान्यासोबतच इतर अत्यावश्यक वस्तूंचे दरही गगनाला भिडले आहेत. संपूर्ण पाकिस्तानमध्ये अनेक वर्षांनंतर एवढे मोठे खाद्य संकट आलेले दिसत आहे.

Story img Loader