पीटीआय, नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष आपल्या अहंकाराने एवढा आंधळा झाला आहे, की त्यांना सत्य दिसत नाही. देशाच्या जनतेमध्येच त्यांच्याबाबत प्रचंड अविश्वास आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी विरोधकांवर टीका केली. यावेळी त्यांनी मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करीत असून त्याला लवकरच यश येईल, अशी ग्वाहीदेखील दिली. भाषण सुरू असतानाच विरोधकांनी सभात्याग केल्यामुळे अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला.

काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर मंगळवारी लोकसभेत चर्चा सुरू झाली होती. तीन दिवस सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या ठरावाच्या समर्थनार्थ किंवा विरोधात आपल्या भूमिका मांडल्या. त्यानंतर गुरूवारी संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास पंतप्रधान मोदी या चर्चेला उत्तर देण्यासाठी उभे राहिले. जगभरातील एखाद्या सर्वेक्षणामधून देशविरोधी अपप्रचार होत असेल, तर तो अधिक फुलविण्यामध्ये काँग्रेसला अभिमान वाटतो. त्यामुळेच तमिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, त्रिपुरा, ओडिशा या राज्यांमधील जनतेने काँग्रेसवर आपला अविश्वास जाहीर केला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये ‘इंडिया’ आघाडीच्या नावावरही जोरदार तोंडसूख घेतले. जुन्याच गाडीला नवा रंग फासून ती ‘इलेक्ट्रिक वाहन’ असल्याचे सांगून तुम्ही रस्त्यावर आणली आहे, असा टोमणा त्यांनी लगावला. ही ‘इंडिया’ आघाडी नसून ‘घमंडिया’ आघाडी आहे, या मोदींच्या वक्तव्यावरून विरोधकांचा संताप झाला आणि त्यांनी सभात्याग केला. सदर अविश्वास प्रस्ताव हा मुख्यत: मणिपूमधील हिंसाचाराच्या मुद्दय़ावर आला असतानाही पहिल्या दीड तासात पंतप्रधानांनी मणिपूरमधील हिंसाचारावर भाष्य केले नव्हते. विरोधकांच्या सभात्यागानंतर त्यांच्या भाषणामध्ये मणिपूरचा मुद्दा सर्वप्रथम आला.

मणिपूरमध्ये शांततेसाठी प्रयत्न

मणिपूरमधील हिंसाचार आटोक्यात आणून तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून एकत्रितरित्या प्रयत्न केले जात आहेत, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. महिलांबाबत अत्यंत गंभीर अपराध करणाऱ्यांना माफ केले जाणार नाही, त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल, असेही ते म्हणाले. ‘मणिपूरमध्ये भारतमातेला इजा’ केल्याच्या राहुल गांधी यांच्या विधानामुळे देशवासियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. काही जण भारतमातेच्या मृत्यूची इच्छा का करीत आहेत, असा सवाल मोदी यांनी केला. ‘‘हे लोक (काँग्रेस) लोकशाहीची हत्या, राज्यघटनेची हत्या अशी ओरड करतात. पण भारतमातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची वेळ आली, तेव्हा यांनीच तिचे तीन तुकडे केले,’’ असा घणाघात मोदी यांनी केला. मणिपूरमधील घटना वेदनादायी आहेत. महिलांवर अत्याचार अस्विकारार्ह असून गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार काम करीत आहे, असे ते म्हणाले. याबरोबरच इशान्येकडील राज्यांमध्ये आपल्या सरकारने राबविलेल्या विकासकामांची यादीदेखील पंतप्रधानांनी यावेळी वाचून दाखविली. आपण आतापर्यंत ५०पेक्षा जास्त वेळा इशान्येकडील राज्यांना भेटी दिल्या असून आपल्या मंत्र्यांनी ४०० पेक्षा जास्त वेळा दौरे केल्याचा दावाही त्यांनी केला.

विरोधकांचा पाकिस्तानवर अधिक विश्वास

देशात जेव्हा एखादा अतिरेकी हल्ला होतो, तेव्हा काँग्रेस आणि त्याचे मित्रपक्ष आपल्या देशाची अंगभूत ताकद आणि आपल्या सैनिकांपेक्षा पाकिस्तानवर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे ते काश्मीरमधील फुटिरतावाद्यांशी चर्चा करायला जातात, असा आरोप मोदी यांनी आपल्या भाषणात केला.  ‘‘पाकिस्तानातून आपल्या सीमांवर हल्ले होतात. पाकिस्तानातून अतिरेकी घुसवून अतिरेकी पाठविले जातात. मात्र पाकिस्तान कधीही त्याची जबाबदारी स्वीकारत नाही. पाकिस्तानने हात झटकले की यांचा (काँग्रेसचा) त्यावर लगेच विश्वास बसतो. काश्मीर दहशतवादाच्या आगीत होरपळत आहे, या सर्वसामान्यांच्या सांगण्यावर त्यांचा विश्वास नव्हता. त्याऐवजी हुर्रियत, विघटनवादी आणि पाकिस्तानचे झेंडे घेऊन फिरणाऱ्यांवर त्यांचा भरोसा होता,’’ असे मोदी म्हणाले.

अविश्वास प्रस्ताव ‘शुभशकून’

हा अविश्वास प्रस्ताव आपल्यासाठी ‘शुभशकून’ असल्याचा टोमणा मोदी यांनी लगावला. २०१८मध्ये विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर पुढील वर्षी पुन्हा सत्ता मिळाली. आताही यापूर्वीचे सर्व विक्रम मोडून भाजप आणि मित्रपक्ष पुन्हा सत्तेत येतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. विकासासाठी आवश्यक असलेली अनेक विधेयकांवरील चर्चा संसदेमध्ये रोखून धरल्याबद्दल त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

मणिपूरमधील घटना वेदनादायी आहेत. महिलांवर अत्याचार अस्विकारार्ह असून यातील गुन्हेगारांना निश्चित कठोर शिक्षा केली जाईल. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी केंद्र व राज्य सरकार एकत्रिपणे काम करीत असून त्याला लवकरच यश येईल. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Story img Loader