भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बुधवारी तोंडभरून कौतुक केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशभक्तांची संघटना असून, त्यांच्यामुळेच देश एकसंध असल्याचे मत त्यांनी मांडले.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी बेदी यांनी बुधवारी आपला निवडणूक अर्ज दाखल केला. त्यानंतर बोलताना त्यांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अतिशय शिस्तबद्ध संघटना आहे. देश घडविण्यामागील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ते अतिशय राष्ट्रभक्त आहेत. त्यांच्यामुळेच आज देश एकसंध आहे. अनेक लोकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खरे रूप अजून समजलेलेच नसल्याची टिप्पणीही त्यांनी केली.
गेल्या आठवड्यातच त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि दिल्लीतील निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. त्यानंतर भाजपच्या संसदीय पक्षाने त्यांना या निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले.

Story img Loader