Goa Tourism : गोव्यातील बीचवरील शॅक्स राज्याबाहेरील लोकांना भाड्याने देण्याऱ्या मालकांचे परवाने रद्द करण्याचं आवाहन भाजपा आमदार मायकल लोबो यांनी गुरुवारी गोव्याच्या पर्यटन विभागाला केले आहे. कारण, या शॅक्समधून गोव्यातील खाद्यपदार्थांना चालना दिली जात नसून इडली सांबार आणि वडपाव विकला जात असल्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
“आम्ही गोव्यातील लोकांना त्यांचे बीच शॅक्स दिल्लीवाल्यांना भाड्याने देताना पाहिले आहे . बेंगळुरूचा कोणी वडा पाव विकत आहे, तर कोणी इडली-सांबार विकत आहे. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेल्समध्ये इडली-सांबार विकण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही पर्यटकांना काय सांगण्याचा प्रयत्न करत आहात? पर्यटकांना तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर इडली-सांबार विकणार आहात? आपण कोणत्या प्रकारच्या पर्यटनाला प्रोत्साहन देत आहोत?”, असे कळंगुटचे आमदार मायकल लोबो पत्रकार परिषदेत म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील पर्यटनात घट झाल्याची ओरड सुरू असून त्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे, असंही ते म्हणाले.
गोव्यात पर्यटकांची संख्या रोडावली
“किनारी पट्ट्यात, उत्तर असो वा दक्षिण, पर्यटनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे आणि यासाठी अनेक घटक जबाबदार आहेत”, असं ते म्हणाले. “गोव्यात वर्षानुवर्षे येणारे परदेशी पर्यटक येत आहेत, परंतु नवीन पर्यटक, विशेषतः तरुण, इतर ठिकाणी जात आहेत”, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. “विदेशी पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. जर आपण व्यवस्था स्थापित केली नाही, तर येणाऱ्या काळात पर्यटन क्षेत्राला काळे दिवस येतील”, अशीही चिंता त्यांनी व्यक्त केली.
सुमद्रकिनाऱ्यावर गोव्याचे पदार्थ विका
यासाठी फक्त सरकारला दोष देता येणार नाही असा युक्तिवाद करत आमदार म्हणाले, “आपण (भागधारकांनी) प्रथम हे मान्य केले पाहिजे की आपण चूक केली आहे. आपण चुका करत आहोत. आपण शॅक्समध्ये इडली-सांबार विकायला सुरुवात केली. हे थांबायला हवे. जर शॅक्स मालकांनी शॅक्स भाड्याने देण्यास सुरुवात केली तर मग काय उरलं? मी इडली-सांबारच्या विरोधात नाही. ते मुख्य रस्त्यावर उपलब्ध आहे. पण समुद्रकिनाऱ्यावर गोव्याचे पदार्थ दिले पाहिजे. तिथे गोव्याच्या खाद्यसंस्कृतीला चालना दिली पाहिजे”, यावर त्यांनी जोर दिला.
हैदराबाद, महाराष्ट्र आणि कर्नाटकची संस्कृती गोव्यात दाखवणार का?
“स्थानिक खाद्यपदार्थ आणि संस्कृती दाखवण्यासाठी शॅक्स दिल्या जातात. आपण समुद्रकिनाऱ्यावर हैदराबाद , महाराष्ट्र किंवा कर्नाटकची संस्कृती दाखवणार आहोत का? मी सर्व म्हणत नाहीये, पण काही शॅक्स इतरांची प्रतिष्ठा खराब करत आहेत”, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. त्यांनी पर्यटन विभाग आणि सर्व भागधारकांना एकत्र बसून गोव्यात अधिक परदेशी पर्यटक का येत नाहीत याचा अभ्यास करण्याचे आवाहन केले.
” श्रीलंकेला जा आणि तिथले पर्यटन पहा. तो देश भारतापेक्षाही आर्थिकदृष्ट्या गरीब आहे. पण गोव्यात येणारे पर्यटक आता श्रीलंकेला जात आहेत”, असा दावा त्यांनी केला. त्यांनी समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांच्या समस्येचा उल्लेख केला. “जगातील कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावर जा आणि मला समुद्रकिनाऱ्यावरील कुत्रे दाखवा. पर्यटन विभाग म्हणतो की ते पशुपालन (विभाग) चे काम आहे. पशुपालन (विभाग) म्हणतो की ते स्थानिक ग्रामपंचायतीचे काम आहे. समुद्रकिनाऱ्यांवर कुत्रे चावण्याच्या (परदेशी पर्यटकांवर परिणाम करणाऱ्या) अनेक घटना घडत आहेत”, असे ते म्हणाले.