देशातील जनतेला मोदींच्या पोकळ आश्वासनांवर विश्वास नसल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली. त्या शनिवारी बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील प्रचारसभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करत मोदी हे केवळ ‘पॅकेजिंग आणि रिपॅकेजिंग’ मध्ये तज्ज्ञ असल्याचा टोला लगावला. बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सोनियांची ही बिहारमधील पहिली प्रचारसभा होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. मोदींच्या पोकळ आश्वासनांपासून जनतेची सुटका करण्यासाठीच काँग्रेस, जेडीयू आणि राजद ही महाआघाडी रिंगणात उतरल्याचे सोनियांनी यावेळी सांगितले. नरेंद्र मोदी हे स्वत:च्या देशापेक्षा परदेशातच जास्त काळ व्यतीत करतात. त्यांना केवळ शक्तिशाली लोकांची गळाभेट घ्यायला आवडते. मोदी सरकार हे केवळ उद्योगपतींसाठी असून ते शेतकरी आणि गरिबांच्या विरोधात असल्याचे सोनियांनी उपस्थित जनतेला सांगितले. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच देशातील महागाई आणि बेरोजगारांची संख्या वाढल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय, दलित आणि मागासवर्गीय समाजाला देशाच्या घटनेने दिलेला आरक्षणाचा हक्क कोणीही संपुष्टात आणु शकत नसल्याचेही सोनियांनी यावेळी म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा