Drink Gaumutra Before Entering Garba: गणेशोत्सव झाल्यानंतर आता नवरात्रीच्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून गरब्याच्या ठिकाणी फक्त हिंदूंना प्रवेश देण्यावरून वाद निर्माण होत आहेत. अनेकांनी याबाबत विविध उपाययोजना सुचविल्या. आता मध्य प्रदेशमधील इंदूर जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा यांनी नवरात्रौत्सवामध्ये अहिंदू नागरिक गरब्याच्या मंडपात येऊ नयेत, यासाठी एक अजब सल्ला दिला आहे. गरबा आयोजकांनी गरब्याच्या मंडपात येणाऱ्यांना गोमूत्र प्राशन करण्यास द्यावे, असे ते म्हणाले आहेत. माध्यमांशी बोलताना चिंटू वर्मा म्हणाले की, जे हिंदू असतील त्यांची गोमूत्र प्राशन करण्यास कोणतीही हरकत नसेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार चिंटू वर्मा म्हणाले की, गरब्याचे आयोजन करणाऱ्यांना आम्ही आवाहन केले आहे की, त्यांनी गरब्याच्या मंडपात प्रवेश करणारे हिंदूच आहेत का? याची खातरजमा केली पाहीजे. त्यासाठी त्यांनी मंडपात येणाऱ्यांना गोमूत्र प्राशन करण्यास दिले पाहीजे. हे करण्यामागे तुमचा विचार काय? असा प्रश्न विचारला असता वर्मा म्हणाले की, काहीवेळा भलतेच लोक गरब्याच्या ठिकाणी येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वेगळ्या चर्चा समोर आल्या होत्या.

हे वाचा >> Pakistani family in India: पाकिस्तानी कुटुंबानं ‘शर्मा’ नाव लावून बंगळुरूत केलं वास्तव्य; ‘असं’ फुटलं बिंग

वर्मा पुढे म्हणाले, आधार कार्डही आता एडिट केले जाते. त्यामुळे कुणी हिंदू आहे की नाही? याची तपासणी कशी करणार? त्यामुळे गोमूत्र पिण्याची सक्ती केली पाहीजे. हिंदू असेल तर तो यासाठी नकार देणार नाही. दरम्यान वर्मा यांच्या या मागणीवर काँग्रेसने टीका केली आहे. भाजपाकडून समाजात ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेसने केला.

मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नीलभ शुक्ला यांनी सांगितले की, गायींच्या निवारा केंद्राची दुर्दशा झाली आहे, भाजपाचे नेते या विषयावर बोलायला तयार नाहीत. मात्र त्यांना गोमूत्राचे राजकारण करायचे आहे. पीटीआयला दिलेल्या प्रतिक्रियेत शुक्ला म्हणाले, भाजपाकडून गोमूत्र प्राशन करण्यासाठीची मागणी पुढे आल्यामुळे समाजात आणखी ध्रुवीकरण वाढेल. आधी भाजपाच्या नेत्यांनी गोमूत्र प्यावे आणि मग गरब्याच्या मंडपात प्रवेश करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करावा, असेही आवाहन शुक्ला यांनी केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People should drink gaumutra before entering garba pandals says bjp leader chintu verma kvg