भाजपा खासदार आणि कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात सुरु असलेलं कुस्तीगीरांचं आंदोलन हे अद्यापही सुरु आहे. साक्षी मलिक रेल्वेच्या नोकरीत रुजू झाल्याने तिने या आंदोलनातून माघार घेतली आहे अशा काही बातम्या आल्या. मात्र अशा बातम्या म्हणजे अफवा आहेत. मी रेल्वेच्या सेवेत रुजू झाले म्हणजे मी आंदोलनातून माघार घेतली असं नाही. चुकीच्या बातम्या पसरवू नये असं साक्षीने म्हटलं आहे. एवढंच नाही तर नोकरी जाऊ शकते अशी भीती दाखवणाऱ्यांना साक्षीने खडे बोल सुनावले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलंय साक्षी मलिकने?

“आम्ही मिळवलेली पदकं ज्यांना १५ रुपयांची वाटतात, असे लोक आता आमच्या नोकरीच्या मागे लागले आहेत. आमचं आयुष्य पणाला लागलं आहे. त्यापुढे नोकरी तर खूपच सामान्य गोष्ट आहे. आमच्या न्यायाच्या वाटेत आमची नोकरी आली तर अशा नोकरीचा त्याग करायला आम्हाला १० सेकंदही लागणार नाहीत. त्यामुळे मी सांगू इच्छिते की कुणीही आम्हाला नोकरी जाईल ही भीती घालू नये.”

गेल्या काही महिन्यंपासून देशाच्या राजधानीत अर्थात दिल्लीत देशासाठी अनेक पदकं मिळवून देणारे कुस्तीपटू आंदोलन करत आहेत. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात काही महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या गंभीर आरोपांनंतर ब्रिजभूषण यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी हे आंदोलक अजूनही आंदोलनावर ठाम असून पाच दिवसांपूर्वी त्यांनी सरकारला अल्टिमेटम देत आपली सर्व पदकं गंगेत विसर्जित करण्याचा इशारा दिला होता.

ब्रिजभूषण यांच्यावरील गुन्ह्यात नेमकं काय?

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर दोन गुन्हे दिल्ली पोलिसांनी दाखल केले आहेत. त्यामध्ये, नोकरीच्या बदल्यात लैंगिक सुखाची मागणी करण्याची दोन प्रकरणं, लैंगिक छळाची १० प्रकरणं, विनयभंग, लैंगिक हेतूने रोखून पाहाणं अशा आरोपांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People who think our medals are worth 15 rupees are now fearing that we will lose our jobs sakshi gave answer scj