जनतेने पाच वर्षांसाठी दिलेल्या सत्ताधिकारादरम्यान निस्वार्थपणे लोकोपयोगी कामे केली, तर जनता आपल्या चुकाही विसरते, अशा शब्दांत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी जणू आपल्या विजयी हॅट्ट्रिकचे ‘तत्वज्ञान’ मांडले! गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलींबद्दल बोलण्याचे टाळतानाच ‘आधी भारत’(इंडिया फर्स्ट) ही आपली धर्मनिरपेक्षतेची कल्पना आहे, असेही त्यांनी अनिवासी भारतीयांच्या एका सभेला संबोधित करताना म्हटले.
अमेरिकेने नाकारलेला व्हिसा आणि ‘वॉर्टन’ आर्थिक परिसंवादात नाकारलेला सहभाग यांच्या पाश्र्वभूमीवर मोदी यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारतीय अमेरिकन नागरिकांच्या एका सभेत भाषण केले. गुजरात दंगलीतील मुस्लिमांच्या हत्येबद्दल नेहमीच विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य बनलेल्या मोदींनी या विषयावर बोलणे टाळले. मात्र, आपल्या सरकारच्या हातूनही ‘चुका’ घडल्याची कबुली दिली. ‘जेव्हा पाच वर्षांसाठी सत्ताधिकार मिळतो, तेव्हा निस्वार्थपणे जनतेची सेवा केली पाहिजे. तसे केल्यास लोक आपल्या चुकाही विसरतात,’ असे ते म्हणाले.
‘कट्टर हिंदुत्ववादी’ ही आपली प्रतिमाही काहीशी मवाळ करण्याचा प्रयत्न मोदींनी केला. ‘देश हा धर्म आणि विचारसरणीपेक्षाही मोठा असतो. धर्मनिरपेक्षतेबाबत माझी व्याख्या अत्यंत साधी आहे – ‘आधी भारत’. तुम्ही काहीही काम करणारे असा, भारताला तुमचे प्राधान्य असले पाहिजे. भारत सर्वोच्च आहे. भारताचे कल्याण हे आपले ध्येय असले पाहिजे आणि तसे असल्यास धर्मनिरपेक्षता आपोआप आपल्या रक्तात भिनेल,’ असे त्यांनी सांगितले.
मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांमुळे अमेरिकेचा व्हिसा मिळवू न शकलेले मोदी यांचे अमेरिकेतील वॉर्टन बिझनेस स्कूलमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणारे भाषणही प्राध्यापकांच्या विरोधामुळे रद्द करावे लागले होते. मात्र, भाजप समर्थक अनिवासी भारतीयांच्या गटाने त्याआधीच मोदींचे रविवारचे भाषण आयोजित केले होते. अमेरिकेच्या न्यू जर्सीतील एडिसन आणि शिकागो येथे शेकडो लोकांनी मोदींचे हे भाषण ऐकले. या भाषणात मोदींनी केंद्रातील यूपीए सरकारवर टीका करण्याचे टाळले. मात्र, गुजरात सरकारच्या योजनांचे गोडवे गाताना केंद्र सरकाच्या योजनांशी त्यांची तुलना केली.

Story img Loader