चाळीस खासदार कट रचून देशाचा विकास रोखून धरण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा एक प्रकारे लोकशाहीचा अपमानच आहे, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. देशातील ४०० खासदारांना विकास करायचा आहे. मात्र, केवळ ४० खासदार यात अडथळे आणत आहेत, असे मोदी म्हणाले.
चंदीगढ दौऱयावर असलेल्या मोदींनी तिथे एका जाहीर सभेत उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, लोकसभेपेक्षा जनसभा मोठी आहे. त्यामुळे सगळ्या लोकांसमोर मी माझ्या मनातील भावना बोलून दाखवण्याचा निर्णय घेतला. देशातील जनतेने आम्हाला संपूर्ण बहुमत दिले. तरीही सरकारचा आवाज दाबण्याचा प्रयत्न संसदेच्या माध्यमातून केला जातो आहे. लोकशाहीबद्दल लोकांच्या मनात आणखी जागरूकता निर्माण करण्याची वेळ आली आहे. लोकांनी आपल्या लोकप्रतिनिधीवर दबाव टाकला पाहिजे. संसदेच्या कामकाजात सहभाग घेऊन लोकप्रतिनिधींनी प्रश्न विचारले पाहिजेत आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली पाहिजे. संसदेचे कामकाज बंद पाडणाऱया विरोधकांना लोक कधीही माफ करणार नाहीत, असे मोदी यांनी सांगितले. काहीजण केवळ हेकेखोरपणाने वागत असून, देशाच्या दृष्टीने हे अत्यंत दुर्दैवी आहे, असेही ते म्हणाले.

Story img Loader