सात दिवसांच्या उपोषण आंदोलनाला यश
पणजी : जुन्या गोव्याच्या वारसा हद्दीत कथित अवैधरित्या बांधण्यात आलेला बंगला पाडण्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांच्या उपोषणाने सातवा दिवस गाठला असतानाच, या बांधकामाला देण्यात आलेली परवानगी गोव्याचे उपमुख्यमंत्री आणि नगर व क्षेत्र नियोजन मंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी मंगळवारी रद्द केली.
या जागेचे पूर्वीचे पालक असलेले जोझ मारिया डी ग्वेव्हिया डी पिंटो यांना या बांधकामासाठी १८ ऑक्टोबर २०१६ रोजी दिलेली तांत्रिक मंजुरी मागे घेणारा आदेश नगर व क्षेत्र नियोजन (टीसीपी) विभागाने रद्द केला. एला खेडय़ातील भूखंडावरील बांधकाम थांबवण्यात यावे, असे या आदेशात नमूद केले आहे.
जुना गोवा ग्रामपंचायतीने मंगळवारी ‘काम थांबवा’ आदेश जारी केला. पंचायत सदस्यांनी बांधकाम स्थळाला भेट देऊन या आदेशाची प्रत तेथील दारावर लावली.
‘ना- हरकत प्रमाणपत्र (एनओसी) या इमारतीच्या दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आले होते, मात्र त्यांनी स्पष्टपणे पुनर्रचना केली आहे. टीसीपीने २०१६ साली सशर्त तांत्रिक मंजुरी दिली होती. मात्र त्यांनी दुमजली बांधकाम केले आहे, जे संपूर्ण उल्लंघन आहे. एनओसी मिळवतानाही या लोकांनी बदमाशी केली होती. मंजुरी एका व्यक्तीच्या नावाने मागण्यात आली होती, पण ही मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीच्या नावे होती’, असे कवळेकर म्हणाले. ही मालमत्ता तेव्हाही सुवर्णा लोटलीकर व मनीष मुणोत यांच्या नावे होती, मात्र ही बाब आमच्या लक्षात आता आली, असेही त्यांनी सांगितले.
तांत्रिक मंजुरी पूर्वीचे मालक पिंटो यांच्या नावे मागण्यात आली होती. पिंटो यांनी २४०० चौरस मीटर जागा गोवा फॉर्वर्ड पार्टीचे माजी कोषाध्यक्ष सूरज लोटलीकर यांची पत्नी सुवर्णा लोटलीकर यांना, तर ९५०० चौरस मीटर जागा भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी यांचे पती मनीष मुणोत यांना विकली.