सोळा वर्षांपासून लाल फितीत अडकलेला नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प तसेच शतकाहून अधिक काळापासून प्रलंबित मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे काम सुरू करण्यास बुधवारी केंद्राने मंजुरी दिली. रेल्वे अर्थसंकल्पावरील चर्चेत रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी संसदेत ही माहिती दिली.
संसदेत दोन आठवडय़ांपूर्वी महाराष्ट्राची निराशा करणारा रेल्वे अर्थसंकल्प मांडणारे रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी आज लोकसभेत रेल्वेच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना त्याची काही प्रमाणात भरपाई केली. त्यांनी नाशिक-पुणे आणि मनमाड-इंदूर अशा दोन नव्या रेल्वेमार्गांची तसेच मुंबई-कराईकल आणि नागपूर-अजमेर या आठवडी एक्सप्रेस गाडय़ांची घोषणा केली. त्यांनी नाशिक-पुणे हा २६० किमी लांबीच्या रेल्वेमार्गाची घोषणा केली. हा रेल्वेमार्ग नाशिक रोड, सिन्नर, संगमनेर, राजगुरुनगर, चाकण आणि पेगडेवाडी (देहू रोड) असा असेल. यापैकी नाशिक रोड ते सिन्नर या ३० किमी अंतराच्या रेल्वेमार्गाचा खर्च इंडिया बुल्स कंपनी करणार आहे, तर पेगडेवाडी ते पुणे हा ३० किमीचा रेल्वेमार्ग तयार आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च
१ हजार ८६६ कोटी रुपये येणार असून त्यातील निम्मा वाटा राज्य सरकार उचलणार आहे. बन्सल यांनी २२०० कोटी रुपयांचा मालेगाव, धुळे, नरडाणा अशा मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाची घोषणा केली. या प्रकल्पाचाही निम्मा खर्च उचलण्याचे राज्य शासनाने मान्य केले आहे. कामाला सुरुवात झाल्यानंतर आठ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.  
१६ वर्षांनी यश
शतकाहून अधिक काळापासून प्रलंबित मनमाड-इंदूर रेल्वे मार्गही केंद्र सरकारने मंजुरी दिल्याने आता वास्तवात येणार आहे. गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गाचे काम नियोजन मंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. मालेगाव-धुळे-नरडाणा-शिरपूर-सेंधवा-धामणोद-महू-इंदूर असा हा रेल्वेमार्ग होण्यासाठी १०० वर्षांपासून विविध आंदोलने झाली आहेत. या नव्या रेल्वे मार्गासाठी अंदाजे १६०० कोटीहून अधिक खर्च येणार आहे. या खर्चाचा ५० टक्के भार केंद्र तर प्रत्येकी २५ टक्के भार महाराष्ट्र व मध्य प्रदेश सरकार उचलणार आहे. महाराष्ट्र सरकारने हा भार उचलण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. या मार्गामुळे इंदूरचा दक्षिणेकडील बेंगळुरू-हैदराबाद-चेन्नई-कन्याकुमारी या भागाशी सरळ संबंध जोडला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा