पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोग्य मंत्रालयाच्या कोविन पोर्टलवर असलेली माहिती (डेटा) फुटल्याच्या वृत्ताचे केंद्र सरकारने सोमवारी खंडन केले. कोविन पोर्टलवरील माहिती पूर्णपणे सुरक्षित असून तिच्या गोपनीयतेसाठी पुरेशी सुरक्षाव्यवस्था असल्याचेही केंद्राने स्पष्ट केले.कोविन पोर्टलवरील नोंदणीकृत लाभार्थ्यांची माहिती फुटल्याचा दावा करणारे वृत्त खोडसाळ आणि निराधार आहे. देशाची सायबर सुरक्षा संस्था ‘भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथका’ने (सीईआरटी-इन) या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला असून भारतीयांची माहिती फुटल्याचे आढळलेले नाही, असे केंद्राने म्हटले आहे.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथकाने (सीईआरटी-इन) माहिती फुटल्याच्या कथित वृत्ताची त्वरित दखल घेऊन तपासणी केली असता सर्व भारतीयांची माहिती सुरक्षित असल्याचे आढळले.
टेलिग्राम ‘बीओटी’चा वापर करून लसीकरण झालेल्या व्यक्तींची वैयक्तिक माहिती मिळवली जात आहे. लाभार्थीचा मोबाइल क्रमांक किंवा आधार क्रमांकाद्वारे त्यांची वैयक्तिक माहिती मिळवण्यात आली आहे, असा दावा ट्विटर या समाजमाध्यमांवरील काही संदेशांमध्ये करण्यात आला होता. परंतु तपासणीत हा दावा खोडसाळ असल्याचे निष्पन्न झाले, असे केंद्राने स्पष्ट केले.

चौकशीची विरोधकांची मागणी

कोविन पोर्टलवरील नागरिकांची माहिती फुटल्याच्या कथित घटनेच्या चौकशीची मागणी विरोधी पक्षांनी केली. हे प्रकरण गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचा आरोप काँग्रेसने केला. सरकारचा डेटा संरक्षण कायद्या कशासाठी आहे? या प्रश्नाचे उत्तर संबंधित मंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली. तर हा राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे, असे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे.

घडले काय?

करोना लसीकरणासाठी केंद्र सरकारच्या कोविन पोर्टलवर नोंदणी केलेल्या भारतीय नागरिकांची संवेदनशील वैयक्तिक माहिती त्यांच्या आधार आणि पारपत्र क्रमांकांसह टेलिग्राम या समाजमाध्यमावरील एक स्वयंचलित खाते प्रसारित करीत आहे, असे वृत्त सकाळी पसरले होते. समाज-माध्यमांवरही तसे संदेश प्रसारित झाले होते.