पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना शुक्रवारी त्यांच्या इस्लामाबादेतील फार्महाऊसवरून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना पुढील दोन दिवस त्यांच्या फार्महाऊसवरच नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिलाय. सोमवारी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. इस्लामाबादेतील न्यायालयाने गुरुवारी मुशर्रफ यांच्या अटकेचे आदेश दिले होते. 
२००७ साली मुशर्रफ यांनी आणीबाणी लादल्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने त्यांच्या अटकेचे आदेश दिले. यावेळी मुशर्ऱफ न्यायालयात उपस्थित होते. मात्र, निकालानंतर मुशर्रफ आपल्या सुरक्षारक्षकांच्या साह्याने न्यायालयातून पळून गेले होते. अखेर शुक्रवारी सकाळी त्यांना अटक करण्यात आली.
गेल्या चार वर्षांपासून पाकिस्तानबाहेर राहणारे मुशर्रफ गेल्याच महिन्यात मायदेशी परतले. पुढील महिन्यात होणारी पाकिस्तानी संसदेची निवडणूक लढविण्यासाठी मुशर्ऱफ पाकिस्तानात परतले. मात्र, त्यांच्यावर विविध कलमांखाली विविधे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुशर्रफ यांनी जामीनास मुदतवाढ द्यावी, या मागणीसाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आणि त्यांच्या अटकेचे आदेश दिले.