पाकिस्तानात २००७ मध्ये आणीबाणीच्या कालखंडात ६० न्यायाधीशांना बडतर्फ केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना त्वरित अटक करण्याचे आदेश गुरुवारी दिले. तथापि, त्यानंतर न्यायालयाच्या परिसरातच नाटय़मय घडामोडी घडल्या. न्यायालयातील कडेकोट सुरक्षा भेदून मुशर्रफ आपले अंगरक्षक आणि कमांडोंच्या सहकार्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तेथून पसार झाले.
अंतरिम जामिनाला मुदतवाढ मिळावी यासाठी मुशर्रफ इस्लामाबाद उच्च न्यायालयात आले होते. न्या. शौकत सिद्दिकी यांनी त्यांचा मुदतवाढ अर्ज फेटाळून त्यांना त्वरित अटक करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार मुशर्रफ यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस सरसावण्यापूर्वीच अंगरक्षक आणि सर्व कमांडोंनी मुशर्रफ यांना तेथून उचलूनच बाहेर नेले आणि त्यांना गाडीत बसवून ते निघून गेले.
पोलिसांनी पुढील कारवाई करण्याच्या आतच मुशर्रफ यांच्यासमवेत असलेल्या वाहनांचा ताफा न्यायालयाच्या परिसराबाहेर पडला.
मुशर्रफ यांच्या सुरक्षेसाठी न्यायालयात पोलीस आणि निमलष्करी दलाची मोठी कुमक तैनात करण्यात आली होती. मात्र मुशर्रफ यांना लष्कराच्या कमांडोंनी घेरलेले असल्याने ही कुमक काहीही करू शकली नाही. त्यानंतर मुशर्रफ हे इस्लामाबाद शहरानजीकच्या चाक शाहझाद येथील आपल्या फार्म हाऊसवर गेले.
न्यायालयाच्या आदेशानुसार मुशर्रफ यांना अटक करणे गरजेचे असले तरी कायदेतज्ज्ञांचे पथक न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करीत असल्याचे अखिल पाकिस्तान मुस्लीम लीग पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहम्मद अमजद यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा