पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ Pervez Musharraf हेच माझी आई बेनझीर भुट्टोचे मारेकरी आहेत, असा आरोप पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो Bilawal Bhutto यांनी केला आहे. पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी हुकूमशहावर त्यांनी हे आरोप केले.

पीपीपी कार्यकर्त्यांसमोर बोलताना बिलावल म्हणाले, ज्याने गोळी मारली त्यापेक्षा ज्याने माझ्या आईची सुरक्षा कमी केली, त्याला मी या हत्येसाठी जबाबदार समजतो असे सांगत मुशर्रफ मारेकरी असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. दि. २७ डिसेंबर २००७ रोजी रावळपिंडीतील लियाकत बागेत एका निवडणूक रॅलीत झालेल्या हल्ल्यात बेनझीर यांच्यासह २१ जणांचा मृत्यू झाला होता.

यापूर्वी ‘बीबीसी’ला दिलेल्या एका मुलाखतीत बिलावल यांनी आपल्या आईच्या हत्येसंबंधीची महत्वाची माहिती समोर आणली होती. मुशर्रफ यांनी संपूर्ण परिस्थितीचा वापर करत माझ्या आईची हत्या केली. त्यांनी जाणूनबुजून आईची सुरक्षा कमी केली, असे ते म्हणाले. माझ्या आईला थेट धमकी देण्यात आली होती. मुशर्रफ यांच्याशी तुम्ही कसे संबंध प्रस्थापित करता यावर तुमची सुरक्षा अवलंबून आहे, असे सांगण्यात आले होते, असा आरोप त्यांनी केला. हत्येच्या एक दिवस आधी बेनझीर यांची सुरक्षा कमी करण्यात आली होती, असेही ते म्हणाले.

मी वैयक्तिकरित्या मुशर्रफ यांना बेनझीर यांच्या हत्येसाठी जबाबदार ठरवतो. पण माझ्याकडे फोनवर हत्येसंबंधी देण्यात आलेल्या सूचना किंवा गोपनीय संदेशाशी निगडीत पुरावे नाहीत, असे सांगत मी कोणत्याही नाहक कारणासाठी देशातील एखाद्या संस्थेला जबाबदार ठरवणार नसल्याचे म्हटले. पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयात (एटीसी) झालेल्या सुनावणी दरम्यान, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात सरकारचा तपास, कॉल रेकॉर्डिंगकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याचबरोबर डीएनए पुराव्याचाही विचार करण्यात आलेला नाही, असे त्यांनी म्हटले.

एटीसीने ३१ ऑगस्टला बेनझीर यांच्या हत्येप्रकरणी सुनावणी करताना मुशर्रफ यांना फरार घोषित केले होते. दरम्यान, तहरिक ए तालिबान या पाकिस्तानच्या संघटनेच्या ५ कथित सदस्यांना पुराव्याअभावी सोडण्यात आले होते. बेनझीर यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना १७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याचबरोबर मुशर्रफ यांची संपत्ती जप्त करण्याचेही आदेश देण्यात आले होते. दुसरीकडे मुशर्रफ यांनी बेनझीर भुट्टो यांच्या हत्येमध्ये असामाजिक तत्वांचा हात असल्याचे पहिल्यांदाच मानले. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार बुधवारी ही बाब समोर आली.

Story img Loader