पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन नेमका कुठे लपला आहे, त्याचा ठावठिकाणा माहिती होता, असा खळबळजनक दावा नव्याने प्रकाशित होणाऱ्या पुस्तकात करण्यात आला आहे. न्यू यॉर्क टाइम्स या आघाडीच्या वृत्तपत्रासाठी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये अनेक वर्ष वार्ताकन करणाऱ्या ब्रिटनच्या पत्रकार कालरेटा गॉल यांनी हा दावा केला आहे.
‘द राँग एनेमी : अमेरिका इन अफगाणिस्तान २००१-२००४’ या आपल्या नव्या पुस्तकात पाकिस्तानी लष्कराचे निवृत्त प्रमुख जनरल तलत मसूद यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत गॉल यांनी हा आरोप केला
आहे. जर न्यायालयात मुशर्रफ यांच्याविरोधात सुरू असणारे खटले न्याय्य पद्धतीने चालविले गेले तर मुशर्रफ यांच्या कारकिर्दीतील अनेक वादग्रस्त प्रकरणे उजेडात येतील, असा दावा गॉल यांनी पुस्तकात केला आहे.
माजी लष्करप्रमुख जनरल एकदा आपल्याच घरी मुशर्रफ यांच्यासह निवांत बसलेले असताना मुशर्रफ लादेनबद्दल काही बोललेले मसूद यांनी ऐकले. मुशर्रफ लादेनविषयी जे काही आणि ज्या तपशिलांसह बोलत होते, ते पाहता त्यांना लादेनचा ठावठिकाणा, तो नेमका कुठे लपला आहे, कोणाबरोबर आहे आदी तपशील माहिती होता, हे स्पष्ट होत होते, असा दावा गॉल यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.
उद्दिष्ट ‘वेगळेच’..
मुशर्रफ यांनी लादेनसारख्या दहशतवाद्यांना पाठिंबा देणे थांबवावे अशी आपली भूमिका होती आणि आपण तसे वारंवार सांगतही होतो, मात्र पाकिस्तानचे माजी हुकूमशहा ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अल कायदा आणि काश्मिरी अतिरेकी यांच्यात फरक करण्याएवढा मी नक्कीच शहाणा आहे, असा दावा ते करीत असत. मात्र कुठे तरी त्यांना या दोन्ही गटांमध्ये सूत जुळवायचे होते, अशी शक्यता मसूद यांनी व्यक्त केली, असा दावा पुस्तकात करण्यात आला आहे.