पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यासाठी पाकिस्तान सरकारने विशेष न्यायालय स्थापन केले असून या निर्णयास आव्हान देण्याचा निर्णय मुशर्रफ यांनी घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात या निर्णयास आव्हान देण्यात येईल. विशेष न्यायालयातील न्यायाधीश पक्षपाती असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे मुशर्रफ यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
या खटल्यासाठी नियुक्त करण्यात आलेले तिन्ही न्यायाधीश मुशर्रफ यांच्या विरोधात असून त्यांच्याकडून योग्य न्याय मिळण्याची शक्यता वाटत नाही, असे ‘ऑल पाकिस्तान मुस्लीम लीग’च्या प्रवक्त्या आसिया इशाक यांनी सांगितले. सदर निर्णयास आव्हान देणारी याचिका लवकरात लवकर दाखल करण्यात येईल, असेही इशाक यांनी नमूद केले. या तिन्ही न्यायाधीशांचा सर्व तपशील तसेच इतिहासही आम्हास चांगला ठाऊक असून त्यामुळेच मुशर्रफ यांच्याबद्दल पूर्वग्रह बाळगणाऱ्या अशा न्यायाधीशांचीच नियुक्ती सरकारने केल्यामुळे सरकारच्या एकूण मन:स्थितीची कल्पना येते, अशी टीका इशाक यांनी केली.
मुशर्रफ यांनी सन २००७ मध्ये पाकिस्तानात आणीबाणी लागू केल्यामुळे त्यासंदर्भात त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. विशेष न्यायालयात त्याच खटल्याची सुनावणी होईल. पाकिस्तानातील नामवंत वकील शरीफुद्दीन पीरझादा आणि इब्राहिम सात्ती यांनी इस्लामाबाद शहराच्या बाहेर असलेल्या मुशर्रफ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी पुढील व्यूहरचनेसंबंधी विचारविनिमय केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा