वृत्तसंस्था, नवी दिल्ली

वैद्याकीय अभ्यासक्रामांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय प्रवेश सह पात्रता परीक्षेचा (नीट-यूजी २०२४) निकाल रद्द करावा आणि पुन्हा परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाले आहेत. तेलंगणचे अब्दुल्ला मोहम्मद फैज आणि आंध्र प्रदेशचे शेख रोशन मोहिद्दीन यांनी ही याचिका दाखल केली आहे.

विद्यार्थ्यांना मनमानी पद्धतीने वाढीव गुण देण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. अनेक विद्यार्थ्यांना मिळालेले ७२० पैकी ७१८ आणि ७१९ हे उच्च गुण ह्यसांख्यिकीयदृष्ट्या अशक्यह्ण असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने काही विशिष्ट विद्यार्थ्यांना मागील दाराने वैद्याकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवून देण्यासाठी परीक्षेला उशीर झाल्याचे कारण दाखवत वाढीव गुण देणे हा अप्रामाणिक प्रकार होता असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे.

हेही वाचा >>>Narendra Modi Swearing-in Ceremony Updates: मोदींच्या मंत्रीमंडळात वर्णी न लागल्यामुळे अनुराग ठाकुरांची चर्चा; म्हणाले, “मी आधी पक्षाचा…”!

एका विशिष्ट परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले याबद्दलही याचिकेमध्ये शंका उपस्थित करण्यात आल्या आहे. ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने २९ एप्रिलला प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या उत्तर विवरणीबद्दल अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या याकडे याचिकाकर्त्यांनी निर्देश केला आहे. ‘नीट-यूजी’ परीक्षा ५ मे रोजी झाली होती. त्याचा पेपर फुटल्याचा आरोप करत ती रद्द करावी, या मागणीच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीच दाखल करण्यात आल्या आहे.