२००७ मध्ये पाकिस्तानात जारी करण्यात आलेली आणीबाणी तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना चांगलीच महागात पडण्याची चिन्हे आहेत. देशात आणीबाणी पुकारणे हा देशद्रोह असून त्याच आरोपाखाली मुशर्रफ यांच्यावर खटला चालविला जावा, अशी मागणी करणारी याचिका येथील त्रिसदस्यीय विशेष न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. एखाद्या सेवेतील अथवा निवृत्त लष्करप्रमुखावर देशद्रोहाचा खटला चालविण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पाकिस्तानी राज्यघटनेच्या सहाव्या कलमामध्ये राज्यघटनेच्या अंमलबजावणीस स्थगिती दिल्यास आजन्म कारावासाची किंवा देहदंडाची तरतूद असतानाही मुशर्रफ यांनी २००७ मध्ये पाकिस्तानात आणीबाणी लादली होती.  
या पाश्र्वभूमीवर, पाकिस्तान सरकारने इस्लामाबाद येथील त्रिसदस्यीय विशेष न्यायालयाकडे मुशर्रफ यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.
खरा पेच वेगळाच
एखाद्या लष्करप्रमुखावर देशद्रोहाचा आरोप केला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशा वेळी, ही कारवाई टाळण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने या प्रकरणामध्ये उडी घेत आपल्या माजी प्रमुखांचा बचाव करण्याचा प्रयत्न केल्यास त्यामुळे नवीनच पेच उभा राहण्याची शक्यता आहे. असे घडल्यास देशातील लोकशाही चौकटीस धक्का लागू शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.