माजी नौदलप्रमुख अरुण प्रकाश यांचे नातेवाईक असणाऱ्या रविशंकर यांची प्रत्यार्पणाबाबतची याचिका येथील जिल्हा न्यायालयाने बुधवारी फेटाळली. नौदलातील गोपनीय माहिती फोडल्याचा त्यांच्यावर आरोप असून सध्या लंडनमध्ये स्थायिक असणाऱ्या रविशंकर यांना भारताच्या स्वाधीन करावे, अशी मागणी भारताने ब्रिटनकडे केली आहे. भारताने त्यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही बजावली आहे.
नौदलात कमांडरपदावर काम करताना नौदलातील गोपनीय व संवेदनशील माहिती शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्यांना दिल्याचा गंभीर आरोप ४६ वर्षीय रविशंकर यांच्यावर आहे. केंद्रीय गुप्तचर विभागाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी ब्रिटनमध्ये पलायन केले. रविशंकर यांना आमच्या स्वाधीन करावे, अशी विनंती भारतातर्फे २००७मध्ये ब्रिटनला करण्यात आली. त्यानंतर नवी दिल्ली येथील मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढल्याने ब्रिटन पोलिसांनी एप्रिल २०१०मध्ये त्यांना अटक केली.
रविशंकर यांनी या प्रत्यार्पणाला आव्हान दिले आहे. रविशंकर यांची ही याचिका फेटाळण्यात येत असून या निर्णयाला त्यांनी आव्हान दिल्यास ब्रिटनचे परराष्ट्र मंत्रालयच या बाबत अंतिम निर्णय घेईल, असा निर्णय जिल्हा न्यायाधीशांनी दिला. मानव अधिकाराच्या आधारे हे प्रत्यार्पण रद्द व्हावे तसेच भारतातील न्यायालयीन प्रक्रिया रेंगाळणारी असल्याने आमच्या अशिलास भारताच्या स्वाधीन केले जाऊ नये, अशी मागणी रविशंकर यांच्या वकिलांनी केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा