तेल वितरक कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ केल्यानं इंधन दराचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे ३५ पैशांची वाढ केल्यानं देशातील प्रमुख महानगरांसह अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. तर आधीच शंभरीच्या पुढे पोहोचलेल्या मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी नवा उच्चाकं गाठला.

देशात इंधनाच्या दरांनी महागाईत तेल ओतलं असून, शनिवारी पुन्हा एकदा इंधन वितरक कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ केली. तेल वितरक कंपन्यांनी आज (२६ जून) पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर ३५ पैशांची वाढ केली. यामुळे राजधानी दिल्लीसह अनेक ठिकाणाच्या इंधन दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ९८.११ रुपये झालं आहे. तर डिझेल ८८.६५ रुपये झालं आहे.

मुंबईतील पेट्रोलचे दर १०४ रुपयांच्या पुढे…

तेल वितरक कंपन्यांनी केलेल्या वाढीमुळे देशातील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी वाढ बघायला मिळाली. दिल्लीबरोबर मुंबईत पेट्रोलचे दर लिटरमागे १०४ रुपये २२ पैसे झाले आहेत. तर डिझेलही प्रति लिटर ९६.१६ रुपये झाले आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर ९७ रुपये ९९ पैसे झाले आहेत, तर डिझेल ९१ रुपये ४९ पैशांवर पोहोचले आहेत. चेन्नईतील इंधन दर शंभरीच्या घरात पोहोचले आहेत. चेन्नईत पेट्रोल ९९.१८ रुपये प्रति लिटर, तर डिझेल लिटरमागे ९३.२२ पैशांवर पोहोचले आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दरांची माहिती हवीये… मग हे करा

कोणत्याही शहरातील एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकतो. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाईप करायचा आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवायचा. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. हा कोड आयओसीएल वेबसाईटवर आहे. त्याचबरोबर आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून माहिती करून घेऊ शकता.

Story img Loader