चेन्नईजवळील तांबारम येथील चितलापक्कम येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कार्यकर्ते सीतारामन यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. पेट्रोल बॉम्ब फेकणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती तांबारम पोलिसांनी दिली आहे. तर, काल(गुरुवार) देखील कन्नूरच्या मत्तनूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला होता.

केरळ : कन्नुरीतील RSS कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकला; ‘PFI’चे कार्यकर्ते आक्रमक, पोलिसांवरही हल्ला

“पहाटे चारच्या सुमारास आम्हाला मोठा आवाज आला आणि बाहेर आग दिसली. आम्हाला वाटले की हे शॉर्टसर्किट आहे पण तसे नव्हते. आम्ही आग विझवली आणि पोलीस अधिकाऱ्यांना बोलावले. तसेच आमच्याकडे हल्लेखोरांचे फुटेज देखील आहे.” असे सीतारामन यांनी सांगितले आहे.

१५ राज्यांमध्ये अनेक ठिकाणी PFI वर मोठ्या कारवायानंतर, ऑल इंडिया बार असोसिएशन (AIBA) ने PFI वर त्वरीत बंदी घालण्यासाठी केंद्राला विनंती केली आहे. याशिवाय PFI शी संबंधित प्रकरणांच्या विशेषरित्या सुनावणीसाठी विशेष न्यायालय स्थापन करण्याची देखील विनंती केली आहे.

‘पीएफआय’च्या १०६ जणांना अटक –

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी महाराष्ट्रासह जवळपास १५ राज्यांमधील ९३ ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेवर छापे टाकले. दहशतवादी कारवायांना पाठबळ दिल्याच्या आरोपावरून ‘एनआयए’ने ही कारवाई करून ‘पीएफआय’च्या १०६ जणांना अटक केली आहे. त्यात महाराष्ट्रातील २० जणांचा समावेश आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) नेतृत्वाखाली सक्तवसुली संचालनालय (ईडी), दहशतवादविरोधी पथके, स्थानिक पोलिसांच्या मदतीने हे छापे टाकण्यात आले. महाराष्ट्रासह गोवा, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगण, मध्य प्रदेश, राजस्थान, पुद्दुचेरी आणि दिल्लीत ‘पीएफआय’चे पदाधिकारी आणि कार्यालयांवर ही कारवाई करण्यात आली.

न्यायालयाकडून दखल –

पीएफआयने पुकारलेल्या केरळ बंददरम्यान झालेल्या हिंसाचाराची केरळ उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली. आपण मनाई केली असताना बंद पुकारणे आणि त्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान खपवून घेतले जाणार नाही. आदेश मोडणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकारने कडक कारवाई करावी, असे आदेश न्यायालयाने दिले.

आम्हाला या देशाचे नागरिक म्हणून सन्मानाची वागणूक मिळत नाही –

राज्यभरात आमच्या संघटनेच्या २० नेत्यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या आदेशानेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आमच्यावर ही कारवाई केली आहे. आमचा विनाकारण छळ सुरू आहे. आमच्या नेत्यांना चार-पाच वर्षे तुरुंगात टाकून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करीत आहेत. आम्हाला या देशाचे नागरिक म्हणून सन्मानाची वागणूक मिळत नाही, अशी टीका पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (पीएफआय) पुणे जिल्हाध्यक्ष मोहम्मद खैस शेख यांनी केली आहे.

Story img Loader