पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत शनिवारी प्रति लिटर ३ रुपयांनी वाढ करण्यात आली. ही वाढ शनिवारी मध्यरात्रीपासून लागू होईल. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत वाढ होत असल्याने गेल्या महिनाभरात झालेली ही दुसरी भाववाढ आहे.  पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३.१८ रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३.०९ रुपये इतकी वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घसरत असल्याने देशांतर्गत बाजारातही इंधनाच्या दरांत वेळोवेळी घट करण्यात आली. गेल्या वर्षांत पेट्रोलचे दर एकूण १७.११ रुपयांनी घटले होते तर डिझेलचे दर एकूण १२.९६ रुपयांनी घटले होते. मात्र फेब्रुवारीमध्ये दर वाढवण्यात आल्याने हा कल बदलला. यापूर्वी १६ फेब्रुवारीला दर वाढवले होते.