पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर ८० पैशांची वाढ झाली आहे. गेल्या १० दिवसांत नवव्यांदा इंधनाचे दर वाढले आहेत. यामुळे फक्त गेल्या १० दिवसांत इंधन तब्बल ६ रुपये ४० पैशांनी महागलं आहे.
इंधनाचे दर वाढले असल्याने दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलीटर १०१ रुपये ८१ पैसे झाला आहे. याआधी हा दर १०१ रुपये १ पैसे होता. तर दुसरीकडे डिझेलचा दर प्रतिलीटर ९२ रुपये ७ पैशांवर पोहोचला आहे. याआधी हा दर ९३ रुपये ७ पैसे होता.
मुंबईबद्दल बोलायचं गेल्यास ८० पैशांची वाढ झाल्यानंतर एक लीटर पेट्रोल आणि डिझेलसाठी तब्बल ११६ रुपये ७२ पैसे आणि १०० रुपये ९४ पैसे मोजावे लागणार आहेत.
संपूर्ण देशभरात हे दर वाढवण्यात आले आहेत. दरम्यान संबंधित राज्यातील स्थानिक करांच्या आधारे त्यांचे दर वेगवेगळे असतात. २२ मार्चपासून आतापर्यंत नवव्यांदा इंधनाच्या दरात ही वाढ झाली आहे.