दिवाळीच्या पूर्वसंध्येस लोकांना दिलासा मिळणार असून पेट्रोलच्या किमती लीटरमागे एक रुपया पंधरा पैशांनी उतरल्या आहेत. मात्र डिझेलवर चालणारी वाहने पदरी असलेल्यांसाठी फारसे उत्साहवर्धक चित्र नाही. कारण डिझेलच्या किमतीत प्रति लीटर ५० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.
पेट्रोलच्या विक्रीवर असलेले कर लक्षात घेता दिल्लीत पेट्रोलची किंमत एका लीटरसाठी ७१ रुपये २ पैसे इतकी असेल तर मुंबईत हीच किंमत ७८ रुपये ४ पैसे असेल. जून महिन्यापासून पेट्रोलच्या किमती सातत्याने चढय़ा राहिल्या आहेत. या किमती सात वेळा वाढल्या असून प्रत्येक लीटरमागे एकूण १० रुपये ८० पैशांची वाढ झाली होती. या पाश्र्वभूमीवर दरकपातीचा निर्णय लोकांसाठी उत्साहवर्धक ठरेल, यात वाद नाही. दरम्यान डिझेल दरवाढीमुळे, दिल्लीत ते ५३ रुपये १० पैशांना तर मुंबईत ६० रुपये ८ पैशांना मिळेल. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे काही दिवसांपूर्वी अवमूल्यन झाले होते, त्यामुळे तेल कंपन्यांचे नुकसान झाले होते. मात्र आता रुपयाचे मूल्य वधारल्याने एकूण नुकसानापैकी बऱ्यापैकी रकमेची वसुली झाली आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा