पेट्रोलच्या दरात दीड रुपयांची वाढ होण्याच्या गमजा २४ तासांतच विरल्या असून ते स्वस्त होण्याऐवजी पेट्रोलचा प्रति लिटर १.६३ रु.नी वाढविण्यात आला आहे. स्थानिक विक्रीकर आणि मूल्यवर्धित कर वगळून ही दरवाढ तातडीने शुक्रवारी मध्यरात्रीपासून अमलात आली आहे. यामुळे मुंबईकरांना आता पेट्रोलच्या प्रति लिटरसाठी तब्बल ८३.६३ रु. मोजावे लागणार आहेत.
ताज्या दरवाढीमुळे पेट्रोलच्या दरात गेल्या जूनपासून सातवेळा वाढ करण्यात आली असून हा दर १०.८० रु.नी वाढला आहे. विशेष म्हणजे पेट्रोलच्या दरात नजीकच्या काळात दीड रुपयांची घट होण्याचे संकेत गुरुवारीच देण्यात आल्यामुळे वाहनधारक काही प्रमाणात सुखावले होते. मात्र या घोषणेस २४ तासांचाही अवधी उलटण्याची संधी न मिळता दीड रुपयांची घट तर दूरच परंतु प्रत्यक्षात १.६३ रु. वाढ जाहीर करण्यात आल्यामुळे ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार असल्याचे मानले जात आहे. तेल उत्पादनांच्या किमतीचा दर पंधरवडय़ास विचार होतो. गेल्या काही दिवसांत रुपयाची किंमत काही प्रमाणात वाढत असल्यामुळे १५ किंवा १६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आढावा बैठकीत पेट्रोलचे दर कमी होण्याची शक्यता होती, परंतु तेल कंपन्यांनी त्याआधीच पेट्रोलच्या दरात शुक्रवारी वाढ करून ग्राहकांना नव्याने दरवाढीचा झटका दिला आहे.

Story img Loader