आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर उतरल्याने तसेच रुपया वधारल्याने पुढील आठवडय़ात पेट्रोलचे दर लिटरमागे एक ते दीड रुपया कमी होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचबरोबर येत्या काही आठवडय़ांत डिझेल आणि एलपीजीच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्यांचा खिसा हलका होणार आहे.
आयात दरांवरून पेट्रोलच्या दरांचा दर पंधरवडय़ाला आढावा घेतला जातो. त्यामुळे हे दर कमी होण्याची चिन्हे आहेत. मात्र हा थोडा दिलासा मिळत असताना तूट कमी करण्यासाठी डिझेलचे दर प्रतिलिटर तीन ते पाच रुपये, तर एलपीजी सिलिंडर ५० रुपयांनी महाग होण्याची चिन्हे आहेत. रुपया सुधारणे, जागतिक बाजारपेठेत तेलाचे दर कमी होणे आणि सीरियातील तणाव कमी झाल्याने तातडीने भाववाढ करण्याचा दबाव कमी झाल्याचे पेट्रोलियम सचिव विवेक राय यांनी सांगितले. डिझेल आणि गॅसच्या किमतीत एकाच वेळी मोठी वाढ करणे हे राजकीय आणि आर्थिक आव्हान आहे, त्यापासून पळून चालणार नाही, असे सांगत त्यांनी भाववाढीचे संकेत दिले. ग्राहकांना काही बोजा सहन करावाच लागेल, असे त्यांनी  सांगितले.

Story img Loader