पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा भडका उडाल्यानंतर आता सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात घट झाली आहे. शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ९ पैशांची घट झाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोलियम पदार्थाच्या दरवाढीचा भडका उडाला होता. त्याला गेल्या चार दिवसांपासून ब्रेक लागला आहे. त्यामुळे जनता काही प्रमाणात सुखावली आहे.
तेल कंपन्यांनी आपल्या दरात घट केल्यामुळे दर कमी केले जात आहेत. आंतराराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत कमी झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत वधारल्यामुळे दरकपातीचे चित्र दिसत आहे. या नव्या दरानुसार पट्रोलचे दर दिल्लीत ७८.२० रुपये प्रतिलिटर झाले असून काल ते ७८.२९ होते. तर डिझेलचे दरही ६९.२० वरून ६९.११ वर आले आहे.
या दरकपातीमुळे देशातील कोट्यवधी जनतेला काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी लखनऊ येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी डॉलर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे स्पष्ट केले होते. आणि लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. त्यानुसार, आता केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनाच्या किंमती कमी करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसू लागले आहे.
दरम्यान, गेल्या ४ दिवसात पेट्रोलच्या दरात एकूण २३ पैसे, तर डिझेलच्या दरात एकूण २० पैशांची घट झाली आहे.